तळेगाव दाभाडे : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून विष पिलेल्या प्रियकराचा गुरुवारी (दि. १६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रेयसी असलेल्या पोलीस ठाण्यातील वायरलेस कक्षातील कर्मचारी महिलेने ओढणीच्या साहाय्याने फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस सहकारी महिलेच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. ही घटना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात घडली.शंकर ज्ञानेश्वर भिकुले (वय २८, रा. पांडे, ता. भोर, जि. पुणे) असे विष पिऊन आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १४) सायंकाळी ६:३०च्या सुमारास शंकर भिकुले यांनी पोलीस ठाण्याच्या वाहनतळाजवळ विषारी औषध प्राशन केले. तेव्हा ड्युटीवर असणा-या महिला पोलिसाला तू माझ्याशी लग्न का करत नाही, अशी शाब्दिक बाचाबाची केली. भिकुले बेशुद्ध पडल्याने पोलीस आतिष जाधव, संजय केळकर, बंडू मारणे आदींनी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले.दरम्यान, प्रेयसी असलेल्या महिला पोलिसाने वायरलेस कक्षात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिला पोलीस नाईक हिच्या सतर्कतेमुळे संबंधित महिला पोलिसाचा जीव वाचला. भिकुले यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. १६) सकाळी साडेनऊला त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल दोघांवर गुन्हा दाखल असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करीत आहेत.लग्नाला संबंधित महिला पोलिसाच्या कुटुंबीयांचा विरोध होता. भिकुले हा मॅकेनिकल इंजिनिअरिंग पदवीधर होता. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गप्पा मारण्यासाठी आला होता.
पुणे: लग्नास नकार दिल्याने युवकाची आत्महत्या, प्रेयसी महिला पोलिसानेही केला आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 6:26 AM