पिंपरी : दसऱ्यानिमित्त भाजीपाल्याची आवाक होत नसल्याने पुणे व मोशी येथील बाजार बंद होता. तसेच चाकण येथील बाजाराला साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे पिंपरी येथील बाजारात सोमवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. परिणामी भाजीपाल्याची चढ्यादराने विक्री झाली. गेल्या आठवड्यात ४० रुपयांचा दर असलेली भेंडी सोमवारी ८० रुपये प्रतिकिलो विक्री झाली. पालकचेही दर दुप्पट झाले.
राज्यात वादळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच दोन आठवड्यांपासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला. पालेभाज्या शेतातच सडत असून भाजीपाल्याचे उत्पादन घटले. परिणामी आवक कमी होत आहे. त्यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. त्यामुळे ऐन उत्सवांच्या दिवसांत सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
दसऱ्यानिमित्त शेतमजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे भाजीपाला तोडणी, काढणी शक्य होत नाही. परिणामी बाजारात मालाची पुरेशी आवक होत नाही. त्यामुळे दस-याच्या दुस-या दिवशी मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात येते. त्यानुसार सोमवारी पुणे व मोशी येथील बाजारात मालाची आवक झाली नाही व खरेदी विक्री देखील झाली नाही. तसेच चाकण येथील बाजार दर आवठड्याला सोमवारी बंद असतो. त्यामुळे मावळ, मुळशी, खेड तालुक्यातील शेतकऱ्ययानी पिंपरी येथील उपबाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. येथील लालबहादूर शास्त्री मंडईतील तसेच शहर व परिसरातील विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
--------------+-----------
गृहिणींचे बजेट कोलमडले
पिंपरी बाजारात गेल्या आठवड्यात प्रतिगड्डी १५ रुपये असलेले पालकचे दर सोमवारी ३० रुपयांपर्यंत होते. प्रतिगड्डी १५ रुपये असलेली कोथींबीर या आठवड्यात २५ रुपये प्रतिगड्डी झाली. कांदापात गेल्या आठवड्यात २० रुपये होती, ती या आठवड्यात प्रतिगड्डी ६० रुपयांपर्यंत वधारली. घेवडा, श्रावणी घेवडा, शेवगा, फ्लॉवर, पापडी वाल, मटारच्या भावातही मोठी वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
------------------+----------
आठवडाभर झालेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. तसेच भाजीपाल्यालाही त्याचा फटका बसला. परिणामी आवक कमी झाली. त्यात पुणे, मोशी व चाकण येथील बाजार बंद असल्याने विक्रेत्यांनी पिंपरीत गर्दी केली.
- योगेश खोत, भाजीपाला विक्रेता, पिंपरी
-----+++
तीन महिन्यांपूर्वी भेंडीची लागवड केली होती. दरम्यान पावसामुळे नुकसान झाले. अनेक शेतक-यांनी त्यांच्या शेतातील भाजीपाला उखडून फेकून दिला. पिंपरीतील बाजारात भेंडीला चांगला भाव मिळाला.
- सत्यवान गंगाराम बर्गे, भेंडी उत्पादक, चिंबळी, ता. खेड
-----------+------------
सकस आहार घेण्याचा डॉक्टरांकडून सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हिरव्या भाज्यांवर भर आहे. मात्र पालेभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. कोरोनामुळे काटकसर करावी लागत असतानाच भाज्यांचे दर वाढीचे संकट ओढावले आहे.
- संध्या माळवदकर, गृहीणी, पिंपरी
---+-----
फळभाज्या व प्रतिकिलो दर
कांदा ७० ते ८०, बटाटा ५०, लसूण १००, आले ६० ते ७०, भेंडी ७० ते ८०, गवार ८०, गावराण गवार – १२०, टोमॅटो २५ ते ३०, मटार १५०, श्रावणी घेवडा १६०, घेवडा १४०, दोडका ७० ते ८०, हिरवी मिरची ६० ते ७०, ढोबळी मिरची ८०, दुधी भोपळा ३०, काकडी २० ते २५, कारले ५० ते ६०, गाजर ६०, पापडी वाल ८०, फ्लॉवर ८० ते १००, कोबी ५० ते ६०, वांगी ८०, तोंडली ५०, बिट ७० ते ८०, कोहळा ४०, पावटा ७० ते ८०, शेवगा ८०, रताळी ३०, लिंबू (शेकडा) १००, शेवगा १२०,
---++------
पालेभाज्यांचे दर (प्रतिगड्डी)
पालक ३०, कोथिंबीर २० ते २५, मेथी २५, शेपू २०, कांदापात ५०, मुळा २०, चवळी २०, राजगीरा १२ ते १५, हिरवामाठ १०, पुदिना १०, आंबटचुका २०, आंबाडी १५, आळू ५, करडई १५. गवती चहा १०,
---+-----