मोशी : पुणे-नाशिक महामार्गाचे भोसरीतील नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान सहापदरीकरण होणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्याबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. खेड ते सिन्नर रस्त्याच्या कामातून आयएल अँड एफएस कंपनीने अंग काढून घेतल्यानंतर राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, कळंब, आळेफाटा या पाच बाह्यवळण रस्त्यांची कामे मूळ प्रकल्पातून वगळून त्यांची ४५० कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या कामाशी संबंधित सर्व यंत्रणांच्या बैठकीनंतर बाह्यवळण रस्त्यांची कामे सुरू होण्याचामार्ग मोकळा झाल्याची माहिती दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार सुरेश गोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रदीप खोडस्कर, सुहास चिटणीस, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, कार्यकारी अभियंता गणेश चौरे, जुन्नरचे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, भूसंपादन विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बायपास रस्त्यांची कामे वगळून स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिली असून येत्या आठ-दहा दिवसांत या पाचही बायपास रस्त्यांची निविदा प्रसिद्ध करण्याचे खोडस्कर यांनी या बैठकीत मान्य केले. नाशिक फाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या टप्प्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा आढावा घेताना चौपदरीकरण करताना शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई न दिल्याने शेतकºयांनी सहापदरीकरणाच्या भूसंपादनास विरोध केल्याचे खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी या बैठकीत निदर्शनास आणले. त्यामुळे आधीच्या भूसंपादनाची नुकसान भरपाई दिल्याखेरीज नवीन भूसंपादन करण्यास शेतकºयांचा विरोध असल्याचे शेतकºयांनी सांगितले.चौपदरीकरण करताना शेतकºयांना नुकसान भरपाई दिली नसल्याचे भूसंपादन अधिकारी यांनीही मान्य केले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भूसंपादनाचा प्रस्ताव करताना त्याचा विचार करावा, अशी सूचना भूसंपादन अधिकाºयांनी केली. मात्र याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृतपणे भूसंपादनाचा मोबदला दिला नसल्याचे कळविणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.कंपनी-उपकंत्राटदारातील वादामुळे रखडले होते काम४राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (जुना रा. म. ५०) वरील राजगुरूनगर (चांडोली फाटा) ते आळेफाटा दरम्यानचे काम करणाºया आयएल अँड एफएस कंपनी आणि उपकंत्राटदारामध्ये निर्माण झालेल्या वादावरून गेले वर्षभरापेक्षा जास्त काळ रस्त्याचे काम बंद पडलेआहे. विशेषत: राजगुरूनगर, खेड घाट, मंचर, नारायणगाव, कळंब व आळेफाटा येथील बायपास रस्त्याचे काम बंद पडल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.कंपनीने या कामातून अंग काढून घेतल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळविले होते. त्यामुळे बायपास रस्त्यांची कामे रखडणार असल्याचे लक्षात आल्यावर खासदार आढळराव पाटील यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती.आढळराव पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी या पाचही बायपासची कामे वेगळी काढून त्यांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे बायपास रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी तसेच नाशिक फाटा ते राजगुरूनगर (चांडोली) रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी कराव्या लागणाºया भूसंपादनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची बैठक गुरुवारी (दि.२७) बोलावली होती.