पिंपरी : हवामानाच्या लहरीपणामुळे फळांचे उत्पादन कमी होऊन भाववाढ झाली आहे. तरीही चांग़ल्या दर्जाची फळेबाजारात दिसत नाही. ही दर्जेदार फळे चांगली किंमत मिळण्यासाठी परदेशात पाठविली जातात. उलट स्थानिक बाजारपेठेत उर्वरित फळे विक्रीसाठी जातात. कमी भावात शेतमाल व फळेखरेदीच्या ग्राहकांच्या मानसिकतेने कमी दर्जाची फळे आमच्या ताटात येत आहेत.
१०० रुपयांची द्राक्षे...
युरोपला निर्यात होणारी द्राक्षे ९० ते ११० रुपये किलोने उत्पादकांकडून व्यापारी खरेदी करतात. याचा अर्थ त्याहून अधिक किमतीला हीच द्राक्षे निर्यात होतात. मात्र, निर्यात करून शिल्लक राहिलेली द्राक्षे ३० ते ५० रुपये किलोने स्थानिक बाजारपेठेत विकली जातात.
हापूस १२०० रुपयांना...
निर्यातक्षप हापूस उत्पादन केले जाते. मात्र, केवळ १० ते २० टक्के हापूसच निर्यातक्षम तयार होतो. त्याला डझनाला डॉलर व परदेशी चलनाप्रमाणे बाराशे ते दीड हजार रुपयांचा भाव मिळतो. उर्वरित ८० टक्के हापूस व केशर हा स्थानिक बाजारपेठेत ५०० ते १००० रुपये डझनाला विकला जातो.
३०० रुपयांचे सफरचंद
सध्या काश्मीरची सफरचंदे स्थानिक बाजारपेठेत १०० ते २०० रुपयांपर्यंत मिळतात. तरीही ग्राहकांची ती खूप महाग असल्याची तक्रार असते. यापैकी दर्जेदार सफरचंदे परदेशांत निर्यात होतात. तेव्हा त्यांचा भाव किमान दुप्पट ते तिप्पट होतो.
हीच फळे महाग, एक्स्पोर्टची कशी परवडतील?
सध्या फळांचे उत्पादन कमी असल्याने केळी, चिकू, द्राक्ष, आंबा, सफरचंद ही फळे महाग आहेत; तर निर्यात होणाऱ्या दर्जेदार फळांच्या किमती किमान दुप्पट ते तिप्पट असतात. त्यामुळे ही महागडे फळे विकत घेऊन खाण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये अजून तयार झालेली दिसत नाही.
अशी फळे जातात परदेशात ?
परदेशात जाणाऱ्या फळांना कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. त्यासाठी काही मानांकने ठरविलेली असतात. प्रयोगशाळेचे सर्टिफिकेशन झाल्यानंतर तपासणी होऊन ही फळे परदेशात जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत चांगली व सेंद्रीय फळे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ही फळे ऑनलाईन अथवा मॉलमध्ये खरेदी करण्याची मानसिकता आणि जनजागृती वाढू लागली आहे, अशी माहिती राज्य पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
“गेल्या १० वर्षांत खते, औषधे व मंजुरीच्या किमती पाच ते सहा पटीने वाढल्या. मात्र, दहा वर्षांपूर्वी द्राक्ष, आंबा, चिकू व केळीच्या भावात त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत फळांची विक्री करणे शेतकरी व उत्पादकांना परवडत नाही. हॉटेलमध्ये नाष्टा व जेवणासाठी हजाराचे बिल आणि वरती टीप देणारे ग्राहक आहेत. परंतु, हेच ग्राहक बाजारपेठेत १० रुपयांच्या भाजीपाला गड्डीसाठी आणि ५० ते १०० रुपये किलोच्या फळांसाठी घासाघीस करीत राहतात. ही मानसिकता बदलली, तर निर्यातीची फळेसुध्दा स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे शेतक-यांना परवडेल.” - मधुकर कांगणे, संचालक, शेतकरी व उत्पादक कंपनी, सिन्नर, जि. नाशिक.