पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झोपडपट्टीतील नागरिकांना स्वच्छतागृह बांधून देण्याच्या विषयांवर झालेल्या चर्चेत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी अस्वच्छतेचा पंचनामा केला. प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यावर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ राहिल्यास, पाणी समस्येला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश महापौर राहुल जाधव यांनी दिले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत झोपडपट्टीतील नागरिकांना स्वच्छतागृह बांधून देण्याच्या विषय अवलोकनासाठी ठेवला होता. त्यावर चर्चेत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी अस्वच्छतेचा पंचनामा केला. प्रशासनावर जोरदार टीका केली. हागणदारीमुक्त शहर झाल्याचा दावा खोटा आहे, अशी टीकाही केली.
महापौर राहुल जाधव म्हणाले, स्वच्छतागृहाची साफसफाई न केल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. वायसीएमएच रुग्णालयातील शौचालय अतिशय अस्वच्छ आहेत. तेथील शौचालयाची साफसफाई करण्यात यावी. त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. नाल्यांची साफसफाई करावी. नाल्यात सोडले जाणारे मैलापाणी बंद करून ड्रेनेजमध्ये सोडावे. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीटंचाईत पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन करत पाणी चोरावर कारवाई करणार तसेच नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर, स्वच्छतेत हलगर्जीपणा करणारे ठेकेदार किंवा आरोग्य निरीक्षकांवरही कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात चौदा हजार शौचालये बांधली आहेत. त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नियमितपणे शौचालयांची साफसफाई करून घ्यावी. पाणी उपलब्ध करून द्यावे. पुनर्प्रक्रिया केलेले पाणी शौचालयाच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावे. शौचालय अस्वच्छ आढळल्यास आरोग्य निरीक्षकावर निलंबनाची कारवाई केली जाईल. मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले,खरच शहर हागणदारी मुक्त आहे का? मग आपण बिले कोणाला देतो. हा प्रश्न आहे. वर्षभरात किती स्वच्छतागृहे झाली याची माहिती द्यावी.शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, शहर स्वच्छ ठेवण्यात अधिकारी कमी पडत आहेत. उत्पन्नवाढीच्या नावाखाली पत्राशेडला परवानगी देण्याचे नवे खूळ काढले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडणार आहे. अनधिकृत फलेक्सबाजीवरही प्रशासनाचे नियंत्रण नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले,स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. आपले हगणदारीमुक्त शहर केवळ कागदावरच आहे.