पिंपरी : पोलीस चौकीत तक्रार देण्यास येऊन पोलिसांशी हुज्जत घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच अरेरावी करून पोलिसांना धमकी दिली. मोहननगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.तुषार बाबू मंजाळकर (वय २५), तेजस दिगंबर शिंदे (वय २४), जया बाबू मंजाळकर (वय ४६) आणि वंदना दिगंबर शिंदे (वय ४५, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी धर्मराज किसन तोडकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथील रेशनिंगच्या दुकानाचे धान्य घेऊन वाहन आले होते. ते धान्य रेशन दुकानात उतरवून घेताना काही जणांनी अडथळा केला. त्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले. धान्य उतरवून देण्याबाबत काही हरकत असल्यास पोलीस चौकीत तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी पिंपरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मोहननगर पोलीस चौकीत पोहचले. तेथे त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करून धमकी दिली. आरडाओरडा करून आरोपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावी केली. तुम्ही आमच्या मुलांना मारून टाकताय का, आम्ही तुमची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू, तुम्हाला आम्ही कोण आहोत, ते दाखवून देऊ, अशी धमकी आरोपी यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदीचा आदेश असताना विनाकारण घराबाहेर पडून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.---------------------------------
पिंपरी चिंचवड येथे पोलिसांशी हुज्जत घालून आत्महत्येचा प्रयत्न, चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 4:26 PM
आरडाओरडा करून आरोपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावी करून दिली धमकी
ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा