पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासूनची निष्ठा धुळीस मिळवत आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा गुरुवारी दिला. मात्र भाजपाप्रवेशाबाबत अद्यापही अनिश्चिता असल्याने लांडगेंच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सत्तेची फळे चाखण्यासाठी ते पक्षांतर करणार असल्याने अनेक वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेत दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता आहे. या काळात २००४ मध्ये माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रभागातील पोटनिवडणुकीत महेश लांडगे पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर २००७ व २०१२ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीतूनच संधी मिळाली. शिवाय स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली. तरीही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवून ते निवडून आले. दरम्यान, राज्यात सत्तापालट होऊन भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी केली. मात्र, महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दोन वेळा समर्थक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु, ठोस आश्वासन न मिळाल्याने ते अद्याप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्टपणे सांगताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: October 15, 2016 3:04 AM