पिंपरी : लष्करातील स्टोअर किपर व मल्टिटास्क ड्रायव्हर व्हेईकल या पदाच्या साठ परिक्षार्थींना प्रश्नपत्रिका दिल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी दिल्ली येथून राजेशकुमार दिनेशकुमार ठाकूर (रा. नारायणा, दिल्ली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तर आतापर्यंत सतीश ढाणे, श्रीराम कदम व वानखेडे या तीन आरोपींना यापुर्वीच अटक झाली आहे.
२००५ मध्ये दिघी येथे कार्यरत असताना राजेशकुमार हा श्रीराम कदम याच्या संपर्कात आला होता. त्यावेळी कदम याने त्याची आपली भरतीपुर्व प्रशिक्षण अकादमी असल्याची माहिती दिली.त्यानंतर पदोन्नतीने राजेशकुमार हा दिल्ली येथे जॉईंट डायरेक्टर पदावर कार्यरत होता. स्टोअर किपर व मल्टिटास्क ड्रायव्हर व्हेईकल या पदांकरिता गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबर २०२१ ला लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यानेच या दोन्ही पदांची प्रश्नपत्रिका अन्य आरोपींना दिल्याची बाब तपासात उघड झाली आहे. त्यामोबदल्यात पुणे विमानतळावर त्याने रोख रक्कमही स्विकारली होती. तर त्यापैकी काही रक्कम त्याच्या मुलाच्या बॅंख खात्यात जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचा मुलगा हॉवर्ड विद्यापीठात शिक्षण घेत आहे. आरोपींनी नेमक्या किती परिक्षार्थींना प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, तसेच त्या मोबदल्यात नमेकी किती रक्कम घेतली आहे, याचा तपास सुरु आहे.