रहाटणी : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयजयकार करीत दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण अंत:करणाने भाविकांनी निरोप दिला. रहाटणी व पिंपळे सौदागर येथील पवना नदीच्या घाटावर दुपारपासून भाविक गणपती विसर्जन करण्यासाठी येत होते. लाडका गणपती बाप्पा घरी येणार याची मागील काही दिवसांपासून लगबग सुरू होती. सोमवारी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. भाविकांनी मनोभावे पूजा-अर्चा करून प्रथेप्रमाणे अनेक भाविकांनी मंगळवारी दुपारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. घाटावर गणपती विसर्जन करताना भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथेही देवी आई दत्त माता मंदिराच्या घाटावर व महादेव मंदिर घाटावर हौदाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली आहे. या दोन्ही ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. घाटावरून नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गणपती विसर्जनाअगोदर आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, रहाटणी येथील घाटावर हौदाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे या घाटावर भाविकांना नदीतच गणपती विसर्जन करावे लागणार आहे. रहाटणीतील नदीघाटावर पालिका प्रशासनाने तात्पुरता हौद उभारावा. जेणेकरून पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यास आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही. तसेच मूर्तींच्या विसर्जनामुळे नदीच्या पाण्याचे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)
रहाटणीत दीड दिवसाच्या गणपतीला निरोप
By admin | Published: September 07, 2016 1:15 AM