दिघी : शहरात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना मात्र श्वानदंशावर प्रतिबंधात्मक रेबीज लसीचा तुटवडा भासतो आहे. श्वानदंशामुळे उपचार घेण्यास आलेल्या रुग्णांना रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारे प्रतिसाद मिळत नाही. हतबल झालेले रुग्णाचे नातेवाईक वैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधतात. मात्र, त्यांच्याकडूनही योग्य दखल घेतली जात नाही. या प्रकाराबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात श्वानदंशावर प्रतिबंधक रेबीज लस घेण्यासाठी सोमवारी रुग्णांनी गर्दी केली होती. मात्र महापालिकेच्या औषध भांडारात ते उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय झाली. शासकीय रुग्णालयात चारशे रुपयांना मिळणारी रेबीजची लस रुग्णालयाबाहेर खासगी औषध दुकानात अडीच ते तीन हजार रुपये किंमत मोजून घेणे भाग पडते. ठरावीक कालावधीत पाच वेळा ही लस घ्यावी लागते. सरकारी रुग्णालयात ती उपलब्ध न झाल्यास खासगी औषध दुकानातून तीन ते चार वेळा ही लस खरेदी केल्यास १४ हजार रुपये खर्च येतो. श्वानदंश झालेले रुग्ण भीतीपोटी हा खर्चाचा भुर्दंड सोसतात.सल्ला : श्वानदंशाचे रुग्ण शोधावेतश्वानदंश झालेल्या रुग्णांना रेबीजच्या लसीचा तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जाते. अडीच ते तीन हजारांची लस खासगी औषध दुकानातून घेतल्यास ती एकापेक्षा अनेक रुग्णांना द्यावी लागते. त्यामुळे बाहेरून लस आणण्याबरोबर श्वानदंश झालेले तीन ते चार रुग्ण शोधण्याचा सल्लाही रुग्णालयातील डॉक्टर उपचारास आलेल्यांना देतात. रुग्ण शोधण्यासाठी रुग्ण आणि नातेवाइकांची धावपळ उडते. तीन ते चार श्वानदंश झालेल्या रुग्णांचा शोध लागत नाही, तोपर्यंत एका रुग्णाचा केसपेपर तयार केला जात नाही. रुग्ण शोधण्यासाठी नातेवाइकांची होणारी फरफट व वाया जाणारा वेळ यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.