पिंपरी : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा फायदा करून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. बांधकाम व्यावसायिकासह ३७ जणांची प्रथमदर्शनी आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पिंपळे सौदागर येथे १ सप्टेंबर २०२१ ते २७ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून आठ लाख ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.
सागर संजय जगदाळे (वय २८, रा. रावेत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह जय मावजी, निजय मेहता, निकुंज शहा, नीलेश शांताराम वाणी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेश मुरलीधर शिंदे (वय ४४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी २७ जानेवारी २०२२ रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडींग ब्रोकर कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा फायदा करून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले. मात्र गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा कोणतीही रक्कम फिर्यादीला दिली नाही. तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या ॲपवर बनावट व खोटा इलेक्ट्रानिक अभिलेख तयार करून फिर्यादीची व इतरांची आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला. इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीचे रावेत येथे कार्यालय असून, तेथे कामकाज सुरू असल्याचे तपासा दरम्यान समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. इन्फिनॉक्स कॅपीटल कंपनीतील संचालक व इतरांवर गुन्हा दाखल झाल्याचे माहीत असूनही आरोपी सागर जगदाळे हा इतर आरोपींसोबत मोबाईल व इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे संपर्कात असल्याचे समोर आले.
हवाला कनेक्शनविविध क्षेत्रातील लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून आरोपी जगदाळे हा फसवणूक करत होता. टॅब, दोन मोबाईल, बॅक पासबुक, बॅक चेकबुक व इतर कागदपत्रे त्याच्याकडे मिळून आली. तसेच हवाला करीता वापरलेल्या १० रुपयाच्या चलनी नोटा देखील पोलिसांनी हस्तगत केल्या.
नोकरीला आला अन्...आरोपी जगदाळे हा सेल्समन म्हणून काम करीत होता. दरम्यान त्याने साॅफ्टवेअर टेस्टिंगचे काही शाॅर्ट कोर्सेस केले. त्यानंतर तो शेअर ट्रेडिंगमधील कंपनीत नोकरीसाठी आला. ही नोकरी करीत असताना त्याने लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखविले.
देशभरातील नागरिकांची फसवणूकइन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीमार्फत फॉरेक्स ट्रेडींगव्दारे जास्त परतावा देतो, असे आरोपींकडून सांगण्यात येत हाेते. पिंपरी -चिचवड, पुणे व देशभरातील नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. यातील ३७ जणांचे जबाब पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोंदविले आहेत. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.