लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : जुनी सांगवीतील अहल्यादेवी होळकर दशक्रिया विधी घाटापासून पिंपळे गुरव, कासारवाडीपासून रावेतपर्यंत पवना नदीपात्रात राडारोडा (भराव) टाकून नदीचे पात्र अरुंद बनविण्याचे काम जोमात सुरू आहे. यामुळे पवना नदीची रुंदी मीटरवरून काही फुटांवर आल्याचे दिसून येत आहे. भविष्यात नदीपात्र गायब होते की काय, अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. सुरुवातीस मुळा, मुठा, पवना नदीची रुंदी प्रशस्त होती. काही वर्षांपूर्वी ही रुंदी मीटरवर आली, तर आज काही फुटांवर आली आहे. यामुळे नद्यांचा श्वास गुदमरत आहे. त्यामुळे पवना नदीची रुंदी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. हा भराव टाकून हजारो हेक्टर जमीन तयार करण्यात येत आहे. तरीही प्रशासन गप्प का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.फुगेवाडी स्मशानभूमीसमोर भराव टाकण्यात आला आहे. दापोडी बॉम्बे कॉलनीकडे जाणारा रस्ता, पिंपळे गुरव येथील शिवरामनगर येथे एका वर्षापासून हजारो ट्रक डंपिंग होत आहेत. या भरावाची उंची ३० ते ४० फूट आहे. संबंधित नागरिक भरावावर पत्राशेड, सिमेंट काँक्रिट करून उद्योग व व्यवसाय सुरू करीत आहेत. त्यामुळे पुढील पिढीला सांगावे लागेल की, येथे पवना नदी होती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भरावामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रालगत, तसेच पाण्यातही भराव टाकला जात आहे. परिसरातील बीट निरीक्षक, कार्यकारी अभियंता आरोग्य विभाग (पर्यावरण), शहर अभियंता, महापालिकेचे आयुक्त यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई का केली जात नाही, असा सवाल नगरिकांकडून केला जात आहे. पंधरा दिवसांत कारवाई नाही केली, तर होणाऱ्या नुकसानीस संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा इशारा शहर मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत मनसेचे पर्यावरण शहर सचिव राजू सावळे यांनी खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे, विभागीय आयुक्त, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.
पवना नदीपात्रात टाकला जातोय राडारोडा
By admin | Published: July 17, 2017 4:07 AM