पिंपरी: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. भारतीय जनता पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी अशी काटे की टक्कर झाली. महाविकास आघाडीतील काटे-कलाटे मत विभागणीचा फायदा होऊन भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी एकतीसाव्या फेरी अखेर २९ हजार ६८९ मतांची आघाडी आहे. त्यांची विजयी घोडदौड सुरू आहे.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे सभागृहामध्ये गुरुवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह २८ उमेदवार रिंगणात होते. चिंचवड मधील एकूण ५ लाख ६७ हजार ९५४ मतदारांपैकी २ लाख ८७ हजार ४८९ नागरिक यांनी मतदान केले. पोट निवडणुक मधे ५०.५३ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. सुट्टीचा दिवस असल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.
अशी वाढत गेली उत्कंठा!
उमेदवारी जाहीर होण्यापासून तर मतमोजणी पर्यंत ही निवडणूक तिरंगी असल्याची चित्र दिसून येत होते. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.उत्कंठा वाढत गेली.
कार्यकर्ते आणि उमेदवारांचा जीव टांगणीला!
मतमोजणी रावेत, किवळे, परिसरातून मतमोजणी सुरुवात झाली. रावेत, वाल्हेकर वाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर, चिंचवडगाव, केशवनगर, तानाजी नगर, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पुनावळे, पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी मतमोजणीच्या 37 फेऱ्या झाल्या. सांगवी मधे मतमोजणीचा शेवट झाला.
अश्विनी जगताप यांची आघाडी कायम!
पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे नाना काटे आणि तिसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे होते. ३१ फेरीअखेर २९ हजार मतांची आघाडी अश्विनी जगताप यांनी घेतले आहे. पावणे पाचच्या दरम्यान विजय कडे वाटचाल करणाऱ्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या मतमोजणी केंद्रावर आल्या त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अश्विनीताई जगताप म्हणाल्या, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामांची पावती मतदारांनी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासह महायुतीतील सर्व पक्षांनी कार्यकर्त्यांनी काम केले. विजयाचे श्रेय पक्षातील कार्यकर्त्यांना आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आहे. मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली कामे मी पूर्ण करणार आहे. शास्तीकर माफी, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, तसेच रावेत किवळे भागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार आहे.''