पिंपरी: जुगार अड्ड्यावर छापा टाकून ३८ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तनगर निगडी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
अमित बलदेव वाल्मिकी (वय ४२), अर्जुन मीयाॅराम चंडालिया (वय ३३), दीपक जयभवान चौहान (वय ३८, तिघेही रा. देहूरोड), बाळू फकीरा साळुंके (वय ४०, रा. निगडी वसाहत), अनिकेत धनंजय पोकळे (वय ३२, रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक गणेश सीताराम कारोटे यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील दत्तनगर येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून कारवाई केली. यात आरोपी हे रम्मी जुगार खेळताना आढळून आले. मोबाईल रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ३८ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.