पिंपरी :रेल्वे हद्दीतील अतिक्रमण विरोधी कारवाईत रेल्वे प्रशासनाने पिंपरीतील निराधारनगरच्या दोनशे झोपड्या हटविण्याची कारवाई केली. शनिवारी(दि. १७ नोव्हें)दुपारी २ वाजाता झालेल्या कारवाईवेळी संतप्त जमावाने बंदोबस्तासाठी आलेल्या रेल्वे पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. रेल्वे पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांनीही जमावावर सौम्य लाठी हल्ला केला. कारवाईस विरोध करणाऱ्या जमावापैकी एकाने झोपड्यांलगतच्या गवताला आग लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या कारवाईमुळे तब्बल दोन तासाहून अधिक काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते. निराधारनगर येथे रेल्वे रूळागलगत सुमारे दोनशेहून अधिक झोपड्या आहेत. रेल्वे प्रशासनाने वेळोवळी नोटीस देऊन त्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र झोपडीधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महिन्यापुवीर्ही झोपडीधारकांना अतिक्रमण कारवाई करण्यात येईल, असे सुचित करण्यात आले होते. मात्र झोपडीधारकांनी कोणीही अतिक्रमणे हटवली नाहीत. घरातील साहित्य अन्य ठिकाणी नेले नाही. रेल्वे प्रशासनाने शनिवारी सकाळपासुनच अतिक्रमण हटविण्याची तयारी केली होती. सकाळी बंदोबस्तासाठी सुमारे दीडशे पोलीस कर्मचारी तैनात होते. रेल्वे रूळाच्या दोन्ही बाजुस रेल्वे पोलीस फौजफाटा घेऊन दोन जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होण्यापुर्वीच रहिवाशांचा जमाव जमू लागला. कारवाई होणार अशी कुणकुण लागल्यानंतर पिंपरी पोलीस चौकीजवळ रहिवाशांचा जमाव एकत्रित आला. रेल्वे पोलीस बलाचे कर्मचारीसुद्धा रेल्वे स्थानकाजवळ सकाळी १० वाजल्यापासून हजर होते. नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण हटवावीत, त्यांचे संसारपयोगी साहित्य बाजुला घ्यावे. अश सूचना देण्यात येत होत्या. बहुतांशी लोकांनी त्यास दाद दिली नाही. काही रहिवाशांनी त्यांच्या घरातील चीजवस्तु रेल्वे रूळाच्या पलिकडील बाजुस नेल्या. टेम्पो, रिक्षातून साहित्य अन्यत्र नेले. या ठिकाणी राहणाऱ्या काही रहिवाशांंनी मात्र जेसीबीच्या साह्याने झोपड्या पाडण्याची कारवाई सुरू होताच, रेल्वे रूळावरील दगड उचलुन पोलीस आणि जेसीबीच्या दिशेने दगडफेक केली. रेल्वे रूळावर दगडफेक सुरू असताना, पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा पाठलाग केला. कारवाईस विरोध करण्यास येणाऱ्या जमावावर सौम्य लाठीहल्ला केला. संतप्त जमावापैकी काहींनी रेल्वे रूळालगतच्या गवताला आग लावली. पिंपरीतील रेल्वे स्थानक ते निराधारनगर दरम्यान गोंधळाचे वातावरण होते. संतप्त जमावाने दगडफेक केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
..........................................
महापालिकेला पुनर्वसनाचा विसर रेल्वेच्या हद्दीतील झोपडीधारक हे गेल्या २५ वर्षांपासूनचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र व अन्य रहिवासी पुरावे आहेत. अनेक वर्षांपासून राहणाºया रहिवाशांना बेघर करू नये. त्यांचे पुनर्वसन करावे. अशी मागणी वेळोवेळी झोपडीधारकांच्यावतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. महापालिका अधिकाºयांनीही पुनर्वसन करण्याचे आवासन दिले होते. रेल्वे प्रशासनाने झोपडीधारकांनां स्वत:हून झोपड्या हटविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र स्थलांतर करण्यासाठी शहरात शासकीय जागा उपलब्ध नाही. अचानक जायचे तरी कोठे? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. रेल्वे प्रशसनाची कारवाईची टांगती तलवार कायम असताना, या ठिकाणी रहिवासी दिवस कंठत होते. महापालिकेने पुनर्वसन करावे. अशी त्यांची आग्रही मागणी आहे.