पिंपरी : लोणावळा- पुणे रेल्वेने प्रवास करणारी पंधरा वर्षांची मुलगी चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी ११ च्या सुमारास तोल जाऊन पडली. धावत्या रेल्वेजवळ ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवुन मुलीला रेल्वे रूळावरून बाहेर काढत तिची सुखरूप सुटका केली. दोन महिन्यात याच रेल्वे स्थानकावर घडलेली ही तिसरी घटना आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेख रोजी शहाउद्दीन (रा. कुदळवाडी) असे रेल्वे अपघातातून बचावलेल्या मुलीचे नाव आहे. लोणावळा पुणे रेल्वेने चिंचवडला येत असताना अपघात घडला. चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबण्यासाठी रेल्वेचा वेग कमी होण्यापुर्वी उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीचा तोल गेला. ती रूळ आणि लोकलच्या फटीत पडली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. हाताला धरून त्यांनी तातडीने तिला रूळाबाहेर काढले. ही कामगिरी पोलीस नाइक अनिल बागूल,कॉन्स्टेबल तुकाराम वाळेकर, रेल्वे पोलीस बलाचे चंद्रकांत गोफणे आणि शेख यांनी केली. या पोलीस कर्मचाऱ्यांचे शेख कुटूंबियांनी आभार मानले.
रेल्वे पोलिसांनी वाचविले मुलीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 4:13 PM
लोणावळा- पुणे रेल्वेने प्रवास करणारी पंधरा वर्षांची मुलगी चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी तोल जाऊन पडली. धावत्या रेल्वेजवळ ही घटना घडली.
ठळक मुद्देदोन महिन्यात याच रेल्वे स्थानकावर घडलेली ही तिसरी घटना