पुणे : मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्या अर्ध्यातूनच परत फिरल्या. रविवारीही डेक्कन क्वीनन, सिंहगड एक्सप्रेस यांसह काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. मुंबईत शुक्रवारी झालेल्या पावसाने मुंबईसह पुण्यातील रेल्वे सेवाही पुर्णपणे कोलमडली. ही स्थिती शनिवारीही कायम राहिली. पावसाचा जोर ओसरल्याने रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे अनेक प्रवासी सकाळी रेल्वे स्थानकार पोहचले. मात्र, बहुतेक लांब पल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्याने तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना निराश होवून घरी परतावे लागले. तर काही प्रवाशांनी इतर प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागला. अनेक प्रवाशांनी आनलाईन बुकींग केली असल्याने, ते प्रवासी स्थानकावर पोहचल्यावर गाड्या रद्दची माहिती त्यांना मिळत होती. तसेच राज्यासह दक्षिण भारतातून मुंबईकडे जाणारे प्रवासी पुणे रेल्वे स्थानकावर उतरत असल्याने, स्थानक खचाखच भरले होते. मिळेल त्या ठिकाणी बसून, प्रवासी गाड्यांची वाट पाहात होते. शनिवारी पुणे-सोलापुर इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, नागपुर सीएसटी दुरांतो, तपोवन एक्सप्रेस, कोल्हापुर -आदीलाबाद, जबलपुर एक्सप्रेस, निजामुद्दीन एक्सप्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. या गाड्या रविवारीही धावणार नाहीत, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. यांसह काही गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत
By admin | Published: June 21, 2015 12:21 AM