पिंपरी : शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे उद्योगनगरीची दाणादाण उडविली. भोसरी एमआयडीसी, शांतीनगर परिसर आणि शहरातील विविध लहान मोठ्या कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. काही हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. पाणी गेल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि यंत्रातील महागडे ऑईल खराब झाल्याने कंपन्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडसह बहुतांश भगात बुधवारी सायंकाळी पाऊस सुरू झाला. रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक हॉटेल, कंपन्या आणि लहान मोठे वर्क शॉपमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी पाण्याची पातळी पाच ते सहा फुटांपर्यंत गेली होती.
भोसरीतील शांतीनगर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये दोनशे ते तीनशे वर्कशॉपमध्ये पाणी गेले होते. येथील दुकानामफहे पाच ते सहा फूट पाणी जमा झाले. इलेक्ट्रॉनिक मोटार, यंत्र आणि मशीन पाण्याखाली गेले. यंत्रामधील इलेक्ट्रॉनिक भाग खराब झाले आहेत. तेथे सीएनसी, व्हीएनसी, सिलिंडर ग्राइंडिग मशीनचा वापर होतो. यंत्रामधील हायड्रोलिक ऑइलचे नुकसान झाले. प्रत्येक यंत्रात २५ ते तीस हजार रुपयांचे ऑइल असते. त्यामुळे या परिसरातील उद्योजकांचे किमान पन्नास लाख रुपयांचे थेट नुकसान झाले आहे. काम खोळंबल्याने होणारे अप्रत्यक्ष नुकसान वेगळे असल्याचे लघु उद्योजक राजेंद्र नाझीरकर यांनी सांगितले.
-----
गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून भोसरी परिसरात व्यवसाय करीत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी देखील पावसामुळे असेच नुकसान झाले होते. कल झालेल्या पावसामुळे दोनशे ते तीनशे लघु आउद्योजकांचे पन्नास हजार रुपयांपासून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था उभारली पाहिजे.
राजेंद्र नाझीरकर, लघु उद्योजक, शांतीनगर, भोसरी
-----
भोसरी एमआयडीसी मधील अनेक कंपन्या १९७३ मध्ये सुरू झाल्या. रस्त्यांचे थरावर थर अंथरल्याने कंपन्या रस्त्याच्या खाली गेल्या आहेत. जोरदार पाऊस झाल्यास पाणी शिरते. तयार मालाचे नुकसान झाले. दसऱ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या गुरुवारी देखील सुरू असतात. मात्र त्यांचा कामाचा खोळंबा झाला. विद्युत यंत्रणेत पाणी गेल्याने काहींना काम थांबवावे लागले.
अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
----
शहरातील पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी येथील काही हॉटेल मध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. काहींमध्ये गुडघाभर पाणी शिरले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या पूर्वी देखील संघटनेने महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर उपाययोजना केली गेली नाही.
गोविंद पानसरे, कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन
--/