लोणावळा, दि. 20 - लोणावळा शहरात मंगळवारी (19 सप्टेंबर ) दुपारपासून जोरदार पावसाला सुरू झाली असून बुधवारीदेखील पावासाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासांत शहरात 122 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मौसमात लोणावळ्यात आज अखेर 5157 मिमी (203 इंच) पावसाची नोंद झाली आहे.
संततधार पावसामुळे येथील नदीनाले वाहू लागले आहेत. काही सखल भागात पावसाचे पाणी साचले असले तरी याचा जनजीवनावर फारसा परिणाम झालेला नाही. पावसाने मागील आठवड्यात चांगली उघडीप दिल्याने पवना धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने आज पहाटेपासून हायड्रो गेटद्वारे 1425 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती अभियंते मनोहर खाडे यांनी दिली आहे.
पावसामुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावरील वाहनांचा वेग मंदावला आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने एसटी बस स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे.