पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतला. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या जाधव यांच्या या लोटांगण कृतीमुळे मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.रिक्षाचालक ते पिंपरी-चिंचवडचेमहापौर अशी भाजपाचे राहुल जाधव यांची ओळख निर्माण झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या जाधव यांनी ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांचे समर्थक म्हणून त्यांना थेट महापौरपदाची संधी नुकतीच मिळाली आहे.महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पुर्वीच्या ऋणानुबंधामुळे जाधव यांना मत दिले होते. मात्र, भाजपाच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ भूमिका घेतली होती. यावरून भाजपात असूनही जाधव यांचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरील प्रेम अजूनही कमी झाले नसल्याचे त्यांच्या कृतीवरून दिसून आले.पूर्वीचे ऋणानुबंधसध्या राहुल जाधव हे भाजपाचे नवनियुक्त महापौर आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे दुसरे महापौर होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. पण राज ठाकरे हे पिंपळे-गुरव येथे आल्याचे समजताच जाधव यांनी तेथे धाव घेतली आणि पक्षभेद विसरत राज यांचे आशीर्वाद घेत त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. महापौर भाजपात असूनही त्यांचे मनसेशी आजही ऋणानुबंध कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज ठाकरेंसमोर महापौर नतमस्तक, भाजपात गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 1:12 AM