पिंपरी : राज ठाकरे यांचे राजकारण संपल आहे. त्यामुळे सध्या ते वैतागले आहेत. उत्तर प्रदेश ही राम आणि कृष्णाची भूमी आहे. येथून गंगा नदी वाहते. यामुळे हिदू बांधवांसाठी उत्तर प्रदेश पवीत्र भूमी आहे. याच उत्तर प्रदेशातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्येत यावं अशी प्रभू रामाचीच इच्छा नाही, असे मत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषेदत व्यक्त केले.
माझं काय होणार, या चिंतेने राज ठाकरे त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते वेळोवेळी भूमिका बदलत आहेत. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने बोलत ते नाटके करत आहेत. आझमी म्हणाले, राज ठाकरे यांनी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे ते आज ही परिस्थिती भोगत आहेत. उत्तर भारतीय समाजाला त्यांनी त्रास दिला. त्यांचा अपमान केला. त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये राज यांच्याबद्दल द्वेष आहे. या द्वेषाला घाबरूनच त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. उत्तर भारतीय नागरिक आपल्या सन्मानासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी.
राज ठाकरे कधी म्हणतात की उत्तर प्रदेशात कोणताही विकास झालेला नाही. कधी म्हणतात की विकास पाहायचा असेल तर उत्तर प्रदेशात जायला हवे. कधी मोदींसोबत गुजरात दौरा करतात. तर, कधी त्यांच्यावर टीका करतात. वेळोवेळी भूमिका बदलून ते नाटक करत आहे. संविधानाच्या विरोधात धर्माला उभे केल जातंय. देशाची परिस्थिती कठीण होत चालली आहे. कोणी भोंगे, कोणी मशिदी, कोणी मंदिरांबद्दल बोलत आहे. विकासावर मात्र कोणीच बोलत नाही. संविधानाच्या विरोधात धर्माला उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सरकारकडून तर नवीन संविधान बनविण्याचाच प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अबू आझमी यांनी केली.
हिंदूत्ववादी आहे हे सांगण्यासाठी चढाओढ
सध्या हिंदूची मते मिळविण्यासाठी हिंदूत्व आहे हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. विशेषत: कॅबिनेट मध्ये बसून आम्हीच बाबरी मशिद पाडली हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे मी कॅबिनेट मध्ये त्यांच्या बाजूला बसायला जाणार नाही.