पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रवाशाला घेऊन जाणा-या मोटारचालकाला अडवून प्रवाशासह मोटारचालकाचे चौघा चोरट्यांनी अपहरण केले. काही अंतर पुढे गेल्यानंतर मोटारचालकाची लुबाडणूक केली. त्या अज्ञात चोरट्यांविरूद्ध सांगवी पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून बुधवारी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांनी देहूरोड, सोमाटणे फाट्यावर वाहनचालकांची लुबाडणूक केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहे, अशी माहिती परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.लुबाडणूक झाल्याप्रकरणी नारायण सुर्वे या मोटारचालकाने फिर्याद नोंदवली होती. त्यांच्या मोटारीतील प्रवाशासह सुर्वे यांचे अपहरण करून जबरदस्तीने निगडी,भोसरी, मोशी परिसरात फिरवले. मोशी येथे फिर्यादीस एटीएममधून ४० हजार रुपये काढण्यास सांगितले. त्या वेळी फिर्यादीने चपळाईने तेथून एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, आरोपींनी प्रवाशाला चिखली भागात नेले. तेथे एटीएममधून त्याला जबरदस्तीने पैसे काढायला लावले. प्रवाशाला तेथेच सोडून ते मोटार घेऊन पळून गेले. मंगेश खारमाटे हे त्या मोटारीतील प्रवासी होते. त्यांच्या मोबाइलवरून आरोपीपैकी एकाने कोणाला तरी संपर्क साधला होता. त्या क्रमांकावरून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. अधिक तपास केला असता, सचिन गोवर्धन गुंजकर (वय २०, रा. डुडूळगाव) हा आरोपी हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता गणेश अशोक घोलप (वय २४, विठ्ठलवाडी), रुपेश मैंदाड (वय २७, रा. चिखली) या अन्य दोन आरोपींची माहिती मिळाली.
चालकाची लूटमार करणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:38 AM