पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमार्फत विविध प्रकारच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातात. त्यासाठी निविदा अर्ज विक्रीस ठेवले जातात. या निविदा अर्जांच्या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागामार्फत यापूर्वी निविदा अर्ज विक्रीचे दर सन २०१३ पासून निश्चित केलेले आहेत. हे दर तीन वर्षांपूर्वीचे असून, खूप कमी आहेत. ते वाढविण्यात येणार आहेत. शासन निर्णयानुसार दरवाढ करण्यास आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. या निर्णयानुसार निविदा संच विक्री व वार्षिक दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ५० हजारांच्या आतील कामासाठी यापूर्वी निविदा संचाचे दर २०० होते. त्यामध्ये ५०० रुपये वाढ प्रस्तावित आहे. ५० हजार ते १ लाखापर्यंत ३०० रुपयांचे दर ७०० रुपये, १ ते ३ लाखांपर्यंतचे दर साडेसातशेहून दीड हजार, ५ लाख ते १० लाखापर्यंतच्या कामासाठी दोन हजार रुपये, १० ते ५० लाखापर्यंत दोन हजार रुपये, ५० लाख ते १ कोटीपर्यंत दहा हजार रुपये, २ ते ५ कोटींपर्यंत १५ हजार, ५ ते १० कोटीपर्यंत २० हजार, १० ते ५० कोटीपर्यंत ३० हजार तर ५० कोटींपेक्षा अधिकच्या कामासाठी ५५ हजार रुपये निविदा संचाचा दर प्रस्तावित केला आहे. या दरवाढीस मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
महापालिका निविदा अर्जांचे दर वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2016 3:22 AM