पुणे : इंग्रजीच्या बोलबाल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची स्थिती एकीकडे निर्माण झाली असताना, आता वाचनसंस्कृतीमध्येही इंग्रजी पुस्तकांचाच प्रभाव अधिक असल्याचे समोर आले आहे. ई-बुक्सच्या जमान्यामध्ये मराठीच्या तुलनेत इंग्रजी भाषेतील कोणतीही हवी ती पुस्तके आॅनलाइन उपलब्ध होत असल्यामुळे तरुण पिढीचा कल हा इंग्रजी पुस्तकांकडे अधिक वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आजकाल तरुण पिढी फारशी वाचत नाही, अशी सातत्याने ओरड केली जाते. हातात मोबाईल, टॅबसारखी तांत्रिक उपकरणे आल्यामुळे पुस्तकांकडे तरुणाईने पाठ फिरविली आहे, अशी चर्चा रंगवली जाते; मात्र या तंत्रज्ञानाचा वापर करूनच ई-बुक्सच्या माध्यमातून पुस्तके वाचण्याचे प्रमाण तरुणाईमध्ये वाढत चालले आहे. त्यामुळे तरुणाईला जागतिक भाषांमधील साहित्य खुणावू लागले आहे. मराठी ही समृद्ध भाषा आहे यात वादच नाही; मात्र ई-बुक्सवर मराठीमधील साहित्य म्हणावे तितके उपलब्ध नाही, ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. पुस्तके विकत घेऊन वाचण्याची म्हणावी तेवढी मानसिकता तरुण पिढीमध्ये नसल्यामुळे आॅनलाइन माध्यमातून पुस्तक खरेदी करण्याकडे तरुणाई अधिक भर देऊ लागली आहे. इंग्रजीमध्ये तरुण पिढी काय वाचत आहे? याची नक्कीच उत्सुकता असेलच. कादंबरीपेक्षाही माहितीपर पुस्तके वाचण्याला तरुणाई प्राधान्य देत असल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समोर आले आहे.आत्मचरित्रे, व्यक्ती किंवा व्यवसायाशी संबंधित यशोगाथा, परिस्थितीला तोंड देऊन मोठी झालेली माणसे आणि त्यांच्याविषयीची पुस्तके वाचनामुळे एकप्रकारची नवीन एनर्जी देतात; कारण संबंधित व्यक्तीचे आयुष्य, तिचे विचार, तिची तत्त्वे, काही आठवणी, किस्से आणि एकूणच जगण्याचा प्रवास जाणून घेणे त्यांना उत्सुकतेचे वाटत आहे. स्वत:चीच मनोभूमिका समजून द्यायला मदत करणारी सिग्मंड फ्रॉइडसारख्या लेखकांच्या पुस्तकांचे विषयही त्यांना जिव्हाळ्याचे वाटत आहेत. आपण कुठल्याही परिस्थितीत असलो, तरी आपण असे का वागतो, याचे विश्लेषण ही पुस्तके जास्त छान करतात त्यामुळे स्वत:लाच समजून घ्यायला मदत होत असल्याचे तरुण सांगतात. माल्कम ग्लॅडवेल, डॅन ब्राउन, पी. जी. वूडहाऊस, रॉबिन कूकचं क्रोमोझोम, याचबरोबर अँटन चेकॉव्ह, नित्शे, ओ. हेन्री, आॅस्कर वाइल्ड, विल्यम शेक्सपिअर, सिगमंड फ्रॉइड, विल डुरंत, जे. जे. मार्टिन, डॅन ब्राउनचे, ओरिजिन, जॉन ग्रीशाम, ली चाइल्ड या इंग्रजी साहित्याकडे तरुणाईचा अधिक ओढा असल्याचे दिसून आले आहे.मी ज्ञान मिळविण्यासोबत मनोरंजनासाठीदेखील पुस्तकांचे वाचन करते. पुस्तके वाचनामुळे नवनवीन व्यापारांविषयी माहिती मिळण्यास मदत होते. ‘लाइफ इज व्हॉट यू मेक इट’ हे माझे आवडते पुस्तक. या पुस्तकाचे लेखक पीटर बफेट असून, या पुस्तकात हार्डवर्किंग, श्रीमंत मुलांच्या कथा सांगितल्या आहेत. या पुस्तकाचे वाचन मला प्रेरणा देणारे ठरले आहे. या व्यतिरिक्त फाइव्ह पॉइंट समवन, २ स्टेट्स, व्यक्ती आणि वल्ली, इन्क्रेडिबल बँकर, इफ गॉड वॉज अ बँकर, द अलकेमिस्ट अशा इतर पुस्तकांचेदेखील वाचन केले आहे. - कल्याणी मित्रगोत्रीडॉ. रॉबिन कूकची २०४’, कोमा १२०४’ अॅण्ड सीझर १२०४’ अशी मेडिकल क्राइमवरील पुस्तके वाचायला आवडतात. यात रुग्णालयातील राजकारण, अवयवांची तस्करी, भ्रष्टाचार याचे चित्रण केलेले असते. आपण ज्या क्षेत्रातील शिक्षण घेतो किंवा ज्याच्याशी संबंधित काम करतो, त्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रातील नवे काही कळते; म्हणून ही पुस्तके वाचायला आवडतात. गुन्हा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात जाणाºयांची सकारात्मक भूमिका किंवा तेही यात कसे गोवले गेले, यांसारख्या वर्णनांतून आपल्याला समजही मिळते.- श्वेता पाटीलआॅर्थर कॉनन डायलचे शेरलॉक होम्स आणि आगाथा ख्रिस्तीचे हर्क्युल पायरो हे मानसपुत्र आॅलटाइम माझ्या फेव्हरेट यादीत आहेत. मराठीत रत्नाकर मतकरी आणि अगदी अलीकडेच रहस्य, गूढकथा आणि मनोव्यापारविषयक कथांच्या विश्वात नेणाºया या लेखकाच्या साहित्याविषयीही विशेष उत्सुकता आहे.- बसवेश्वर बिरादारपुस्तकांना वाचक नाही, वाचकांची संख्या घटत चालली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाºया पुस्तक प्रकाशन व्यवसायाला येत्या काळात आॅनलाइन या नवीन माध्यमाशी जुळवून घ्यावे लागेल. यात अनेकांनी त्याचा प्रभावीपणे वापर करून, आपला व्यवसाय टिकवून ठेवला आहे. मराठीच्या तुलनेत इंग्रजीची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. एका बेस्टसेलर इंग्रजी पुस्तकांची आवृत्ती ही साधारण ५० ते १ लाखाच्या एवढी असते. वाचकांना नवनवीन माहिती, त्याचे प्रभावी सादरीकरण, भाषा, हे सगळे हवे असते; मात्र पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस प्रकाशकांचा प्रमोशनसाठीचा सहभाग महत्त्वाचा आहे. तरुणाईच्या वाचनाच्या सवयी बदलल्या किंडलवर जास्तीत जास्त वाचन करण्याकडे त्याचा कल आहे. हातात पुस्तक घेऊन ते वाचतानाचे दृश्य फारसे नजरेस पडत नाही. त्यामुळे येत्या काळात बदलत्या तंत्रज्ञानाला सामोरे जाऊन त्याचा स्वीकार करून पुस्तकविक्री व्यवसाय टिकेल. पुस्तके आणि प्रकाशक यांना काही केल्या मरण नाही. तसा नकारात्मक विचार करण्याची गरज नाही.- अजय जैन (पुस्तकविक्रेते वर्ल्ड बुक शॉप, कॅम्प)माध्यमे बदलली, तरीही जुन्या कथा-कादंबºयांनाच पसंतीपूर्वी अवांतर वाचनाकरिता लोकांचा वाचनालयाकडे कल असायचा; पण आजच्या बदलत्या काळानुसार वाचनाची स्थळेदेखील बदलली आहे. सोशल मीडिया व अॅण्ड्रॉइड फोनच्या नवीन ट्रेंण्डमुळे आजची तरुण पिढी घरी बसूनदेखील वाचनाचा आनंद घेताना दिसत आहे. वाचनाची स्थळे जरी बदलली असली, तरी आजच्या मॉडर्न पिढीला जुन्या कथा, कादंबºयांचेच वेड दिसून येते. यामध्ये आजही तरुणाईला मराठी पुस्तके जास्त भावत आहे. यामध्ये वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, रणजित देसाई, संदीप खरे, पीयूष मिश्रा, व. पु. काळे यांच्या कथा, कादंबरी, प्रेम, समाज प्रबोधनपर कविता, पुस्तकांकडे तरुण पिढी वळत आहे.मी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असून, मला मराठी साहित्यातील कादंबरी प्रकार खूप आवडतो. आवडते लेखक विश्वास पाटील हे आहेत. त्यांची पानिपत, पांगिरा, महानायक, चंद्रमुखी या कादंबºया विशेष आवडतात. रणजित देसाई यांची स्वामी, शिवाजी सावंत यांची मृत्युंजय या कादंबºया मी चारवेळा वाचूनसुद्धा मला प्रत्येक वाचनात नव्या अनुभवाने मी समृद्ध होतो. वि. स. खांडेकरांच 'पहिल प्रेम' हे पुस्तक आजही कालसुसंगत आहे. व. पु. काळेंच 'पार्टनर' असो की 'कर्मचारी' हे पुस्तके मानवी स्वभावाच चित्रण करतात. - प्रशांत वाघमारेमी सिग्मा या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत ट्रेनी इंजिनिअर आहे. मला बालपणी चांदोबा, अकबर-बिरबलाच्या गोष्टी, आर. के. नारायण यांच मालगुडी डेज हे पुस्तक खूप खूप आवडायचे आता विज्ञानवादी पुस्तके वाचतो. मराठीत अच्युत गोडबोले यांची किमयागार, अर्थात ही पुस्तके समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करण्यास उपयुक्त आहेत. आता कवितेकडे माझा कल वाढत आहे. नुकताच नागराज मंजुळेंचा 'उन्हाच्या कटाविरुद्ध' हा कवितासंग्रह वाचला, त्यातली 'तुझ्या येण्या अगोदर एक पत्र' ही कविता भावली. कवी सौमित्र यांचा 'गारवा', कुसुमाग्रजांचं 'विशाखा' हे कवितासंग्रह खूप आवडतात. - विशाल पाटीलशाळेतल्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे ओझे इतके असते की, वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचायला वेळच मिळत नाही. तरीदेखील जर थोडा वेळ मिळाला, तर रात्री काही वेळ धार्मिक पुस्तक वाचतो. छान वाटते की धार्मिक पुस्तके वाचायला. दिवसभर अभ्यासाची पुस्तके वाचल्याने डोके खूप जड होते; पण काहीवेळ धार्मिक पुस्तक वाचल्याने एक समाधान आणि डोके हलके वाटते. त्यामुळे अशा प्रकारची पुस्तके मी जास्तीत जास्त शाळेला सुट्टी लागल्यावर वाचायला सुरुवात करतो. पुर्वी वाचनासाठी पुस्तके नव्हती. नेहमी काहीनकाही तरी वाचत रहावे. - अर्जुन शिंदेमला लहानपणापासूनच वाचायची आवड आहे. मराठी; तसेच इंग्रजी पुस्तके मी वाचतो. इंजिनिअरिंगला असल्याने मला वाचायला फार वेळ मिळत नाही, तरी मी सुटीच्या दिवशी आवर्जून पुस्तके वाचायला वेळ काढतो. पु. ल. देशपांडे, अमिश त्रिपाठी हे मला आवडतात. आठवड्यातून किमान २-३ तास तरी मी वाचायला देतो. अमेरिकन सायको हे पुस्तक मी सध्या वाचत आहे.- हृषिकेश बोरकरमला मोबाईलवरती भूतकथा वाचन करणे खूप आवडते. अभ्यासामध्ये लहानपणापासून रस असल्याने भरपूर पुस्तकांचे वाचन केले आहे. मी वाचनासाठी दिवसातील सहा तास देतो. त्यातील दोन तास अवांतर वाचन करतो. स्वत:ला कायम प्रोत्साहन देणाºया ऐतिहासिक; तसेच मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचतो. - अभिनंदन गायकवाड
वाचनसंस्कृतीवरही ‘इंग्रजी’चेच वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:39 AM