पिंपरी : स्वारगेट ते पिंपरी मेट्रोचे काम सुरू आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने रेंजहिल्स ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतच्या कॉरिडॉर वनच्या प्रकल्पासाठी एक हजाराव्या सेगमेंटची निर्मिती नुकतीच केली आहे.
पुणे मेट्रोचे काम शहरात वेगाने सुरू आहे. दापोडी ते पिंपरीत खांब उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच सेगमेंटची निर्मिती करण्याचे काम नाशिक फाटा चौकातील दुमजली उड्डाणपुलाजवळील पिंपळे गुरव येथील कास्टिंग यार्ड येथे सुरू आहे. सुमारे चारशे किलोचे वजनाचे हे काँक्रीटचे सेगमेंटची बांधणी अचूक आणि तंत्रशुद्धपणे केली जात आहे. प्रत्येक सेगमेंटला क्रमांक दिला असून, तो सेगमेंट संबंधित निश्चित केलेल्या जागीच बसविला जात आहे. त्यात कोणताही बदल केला जात नाही. रेंजहिल्स ते चिंचवडपर्यंतच्या सुमारे सव्वाबारा किलोमीटर अंतरासाठी एकूण ४५७ खांब उभारले जाणार आहेत. त्यापैकी १८२ खांब उभे केले आहेत. दोन खांबांमध्ये दहा सेगमेंटची जुळवणी करून एक स्पॅन (पूल) पूर्ण केला जातो. दोन पिलरमधील अंतर पंचवीस ते तीस मीटर असे आहे.या सव्वाबारा किलोमीटर मार्गासाठी एकूण तीन हजार सेगमेंट तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक हजार सेगमेंट निर्मितीचा टप्पा नुकताच पूर्ण केला आहे. या एक हजाराव्या सेगमेंटचे पूजन महामेट्रोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते केले. तसेच, या मार्गावर एकूण ५३ स्पॅनची जुळवणी पूर्ण केली आहे. वनाज ते रामवाडी मार्गासाठी सेगमेंट निर्मितीचे काम वाकड येथील कास्टिंग यार्ड येथे सुरू आहे.आतापर्यंत एकूण साडेचारशे सेगमेंटची निर्मिती पूर्ण झाली आहे.शहरातील दापोडीतील हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपुलापर्यंतचे मेट्रो मार्गिका तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. सेंगमेट जुळवणीसाठी खराळवाडीत पहिला गर्डर लाँचर मार्च २०१७ ला बसविला होता. दुसरा गर्डर लाँचर फुगेवाडी-दापोडी रेल्वे उड्डाण पूल चौकात कार्यान्वीत झाला आहे. त्याद्वारे बारा स्पॅनची जुळणी केली आहे. तिसरा गर्डर लाँचर कासारवाडीतील कुंदननगर येथील आई माता मंदिर येथे बसविला आहे.