Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 16:28 IST2024-10-31T16:27:55+5:302024-10-31T16:28:48+5:30
चिंचवड विधानसभेतून उमेदवारी न मिळाल्याने नाना काटेंनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे

Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज कायम ठेवले आहेत. बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले. मात्र नाना काटेंनी माघार न घेतल्याचे सांगितले आहे. यावरून काटे बंडखोरी कायम ठेवणार असल्याचे सध्यातरी दिसते आहे.
काटे म्हणाले, दिवाळी निमित्त अजितदादांनी मला फोन केला भेटून जाईल असे सांगितले होते. त्यांनी मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अपक्ष अर्ज मागे घेण्याबाबत काही चर्चा झाली नाही. चिंचवडमध्ये भाजपचा महायुतीचा उमेदवार आहे. त्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आता तरी मी अर्ज मागे घेतला नाहीये. अपक्ष म्हणून लढण्यावर मी आणि भाऊसाहेब भोईर ठाम आहोत. अजितदादांची काही सूचना आल्यास तुम्ही माघार घेणार का? असे विचारले असता काटे म्हणाले, आता काही सांगता येणार नाही. त्यावेळीच निर्णय घेईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यांच्या बंडखोरीने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी शमविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले होते. त्यांनी पिंपळे सौदागर येथील नाना काटे यांच्या घरी भेट घेतली.
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
चिंचवड ची जागा महायुतीत भाजप ला गेली आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. म्हणून भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मी सांगेल तीच निर्णय घ्यावा लागेल अस मी त्यांना सांगितलं आहे - अजित पवार