Chinchwad By-Election | शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांची बंडखोरी, उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 02:39 PM2023-02-07T14:39:16+5:302023-02-07T14:42:37+5:30
वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेवून रॅलीला सुरुवात ...
पिंपरी : महाविकास आघाडीतून उमेदवारी डावलल्यानंतर शिवसेनेचे माजी गटनेते आणि नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेवून रॅलीला सुरुवात झाली. चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी महाराज आणि थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
थेरगाव येथील ग प्रभाग कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे आदी उपस्थित होते.
काटेंच्या उमेदवारीनंतर कलाटेंची बंडखोरी-
महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शिवसेनेचे राहुल कलाटे ही दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली.
वाकड येथून रॅली काढली. वाकडचे ग्रामदैवत म्हातोबामहाराज यांचे दर्शन घेऊन चिंचवड गाव येथील महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, थेरगाव येथील डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर थेरगाव येथील चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन दुपारी दोनला कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.