पिंपरी : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येण्यासाठी सुरुवात झाली असून, सत्तांतराचे परिणाम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडीत होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असून राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांना फोडण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे. नगरसेवक फुटू नयेत, यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत.राज्यात २०१४ मध्ये भाजपाचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले होते. त्यामुळे मागील २०१७ पूर्वी ३ संख्या असणाऱ्या महापालिकेत ७७ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. तर ८२ नगरसेवकांवरून राष्ट्रवादी ३६ नगरसेवकांवर आली होती. फडणवीसांनी अजित पवार यांचे शिष्य आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांना ताकद दिली. त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपात सामील झाला आणि भाजपाची सत्ता आली.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपा सरकार स्थापन्यास असमर्थ असल्याने महाशिवआघाडीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. बदलाचे परिणाम महापालिकेच्या राजकारणावर होणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस व राष्टÑवादीतून भाजपात गेलेल्या ५० नगरसेवकांची चलबिचल सुरू झाली आहे.महापालिकेतील १२८ नगरसेवकांपैकी भाजपाचे ७७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे नऊ, अपक्ष पाच, मनसे एक पक्षीय बलाबल आहे. राज्यात सत्तांतर झाल्यास अजित पवार महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालणार आहेत. त्यामुळे २१ ला होणाऱ्या महापौर निवडीत भाजपाचे सदस्य फोडाफोडी करण्याची व्यूहरचना केली जात आहे. महापालिकेत महापौरपदाची निवडणूक झाल्यास ६५ मतांची आवश्यता आहे. भाजपाकडे बारा नगरसेवक अधिक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे अपक्ष एकत्र आल्यास हे संख्याबळ ५० सदस्यांचे आहे. त्यामुळे केवळ १५ नगरसेवक फोडण्याची आवश्यकता आहे. किंवा नगरसेवक अनुपस्थित राहिले तरी भाजपाचा महापौर होण्यास धोका होऊ शकतो............
नवीन जुन्यांपैकी कोणास संधीमहापौर निवडीत पक्षाच्या निष्ठावान नगरसेवकांना संधी देणार की नवीन सदस्यांना संधी देणार? आमदार, खासदार समर्थकांना संधी देणार? कोण होणार महापौर याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. महापौर निवडीत निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी काहींनी पक्षाच्या श्रेष्ठींचीही भेट घेतली आहे.