लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराच्या विविध भागातील दहा ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ८८५ कोटी १२ लाख रुपये खर्च येणार आहे. गृहयोजनेच्या ठिकाणी विविध मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ५० कोटी १५ लाख रुपये खर्च होणार आहे. या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मंगळवारी मंजुरी दिली.शहर सुधारणा समितीची साप्ताहिक सभा आज झाली. अध्यक्षस्थानी सागर गवळी होते. विषयपत्रिकेवर दोन विषय होते. मागील आठवड्यातील सभा वृत्तान्त कायम करण्यात आला. या वेळी सह शहर अभियंता राजन पाटील यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. शहराच्या विविध भागात दहा ठिकाणी सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार यातील काही जागा महापालिका मालकीच्या, काही जागा सरकारी गायरान आहेत. यापैकी चऱ्होली आणि रावेत येथील जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत, तर ताब्यात न आलेल्या जागांचे संपादन करण्याची कार्यवाही सुरू आहे. सरकारी गायरानाच्याही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच विविध मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत.
गृह योजनेच्या मूलभूत खर्चास मान्यता
By admin | Published: May 24, 2017 4:06 AM