- नारायण बडगुजर -
पिंपरी : हातगाडी घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील गल्लीबोळात फिरणाऱ्या काही भंगारवाल्यांकडून गुन्ह्यांच्या उद्देशाने '' रेकी '' होत असल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसलेल्या परप्रांतियांचा यात भरणा आहे. दिवसाढवळ्या कोणत्याही दरवाजावर '' नॉक '' केले जाते. घरातल्या महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांनी दरवाजा उघडल्यावर भंगार लेने के लिए साहब ने बुलाया था, असे त्यांच्याकडून सांगण्यात येते. याप्रकारामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, याबाबत पोलीस अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
कामगार नगरी असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातून तसेच परराज्यातूनही बेरोजगारांचा लोंढा येत आहे. यात परप्रांतियांची संख्या लक्षणीय आहे. यातील काही परप्रांतिय हातगाडी घेऊन शहरातील गल्लीबोळात फिरून भंगार खरेदी करतात. यात जुनी पुस्तके, वह्या, पुठ्ठे, प्लॅस्टिक, लोखंडी वस्तू आदींची खरेदी केली जाते. यातील काही भंगारवाले संशयास्पद वावरत आहेत. गल्लीबोळात फिरताना मोठ्याने आवाज न देता थेट दरवाजा वाजविण्यात येतो. घरातील महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांनी दरवाजा उघडला असता भंगार लेने के लिए साहब ने बुलाया था, कुछ भंगार है क्या, अशी विचारणा केली जाते. घरात पुरुष किंवा कर्ता व्यक्ती नसल्याने ज्येष्ठ नागरिक किंवा महिला या प्रकारामुळे घाबरत आहेत. घराची पाहणी करून तसेच गल्लीबोळातील प्रत्येक घरात कोण राहात आहेत, घरात मुले किती आहेत, त्यांच्या शाळेची वेळ, महिलांचे दागिने, घरातील टीव्ही, फ्रीज आदी वस्तू, वाहने किती आहेत, याची पाहणी काही भंगारवाल्यांकडून होताना दिसून येते.
सण, उत्सव असल्याने घरोघरी साफसफाईचे कामकाज केले जाते. त्यामुळे जुन्या वस्तू भंगारात विकल्या जातात. अशा वस्तू खरेदी करण्यासाठी भंगारवाले थेट घरी येतात. त्यामुळे अनेक कुटुंबाकडून समाधान व्यक्त केले जाते. वेळेची कमी असणे, भंगाराचे दुकान माहीत नसणे, भंगारात विक्री करायचे साहित्य वाहून नेण्याची सुविधा नसणे आदी विविध कारणांमुळे दारापर्यंत आलेल्या हातगाडीधारक भंगारवाल्याला त्याची विक्री केली जाते. संबंधित भंगारवाला अनोळखी असतानाही त्याला घरात घेतले जाते. त्याच्याशी व्यवहार केला जातो. याचाच फायदा घेत काही भंगारवाले संबंधित घरांची आणि परिसराची ''रेकी'' करतात.
पिंपरी-चिंचवड शहरात भंगाराची हजारो दुकानेशहरात भंगाराची हजारो दुकाने आहेत. या व्यावसायिकांकडून परप्रांतियांना हातगाड्या उपलब्ध करून दिल्या जातात. हे परप्रांतिय हातगाडी घेऊन गल्लीबोळात फिरून भंगार खरेदी करतात. एका व्यावसायिकाकडे किमान आठ ते दहा हातगाडीवाले परप्रांतिय असतात. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत हे परप्रांतिय गल्लीबोळात हातगाडी घेऊन फिरतात व भंगार खरेदी करतात.
परप्रांतियांची पोलिसांना नाही माहिती भंगाराचा व्यवसाय करणाऱ्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे दिसून येते. तसेच त्यांच्याकडे असलेल्या परप्रांतियांचेही ओळखपत्र किंवा त्यांच्याबाबतची पूर्ण माहिती या व्यावसायिकांना नसते. त्यामुळे कोणता परप्रांतिय नेमका कोठून आला आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत व्यावसायिकांकडे माहिती उपलब्ध होत नाही. तसेच शहरात भंगाराचे किती व्यावसायिक आहेत. गल्लीबोळात फिरणारे भंगारवाले किती आहेत, याबाबत पोलिसांकडेही माहिती नाही. भंगाराच्या व्यावसायिकांकडून त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात येत नाही.
आर्थिक उलाढालीची नोंद नसल्याने गुन्हेगारीचा शिरकावभंगाराच्या व्यवसायात रोख स्वरुपात व्यवहार होतात. त्याच्या नोंदीबाबत बहुतांश भंगारवाले उदासीन आहेत. मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने या व्यवसायात गुन्हेगारीचा शिरकाव आहे. हातगाडीधारक काही भंगारवाले वस्तू चोरून त्याची भंगारात विक्री करीत असल्याचे प्रकार वेळोवेळी समोर येतात.