पिंपरी : बोपखेलच्या नागरिकांसाठी उभारलेला खडकीस जोडणारा तरंगता पूल मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत न काढण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने पूल दुरुस्तीसाठी एक दिवस बंद ठेवता येईल. या निर्णयामुळे बोपखेलच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बैठक बुधवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हाधिकारी सौरभ राव, खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, सीएमई, अॅम्युनिशन फॅक्टरी, सदर्न कमांडचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी, नगरसेवक संजय काटे, चंद्रकांता सोनकांबळे, ग्रामस्थ उपस्थित होते. सीएमईने बोपखेल - खडकीस जोडणारा मुळा नदीवर तरंगता पूल ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या बाजूने मार्ग काढून दिला होता. त्यावरून वाहतूक सुरू होती. सीएमईने हा पूल काढून घेणार असल्याचे गेल्या सोमवारी सांगितले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार होती. त्यांना विश्रांतवाडी-भोसरी मार्गाने सुमारे १५ किलोमीटर अंतराचा वळसा घालून ये-जा करावी लागणार होती. या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. रस्त्यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू असून, अंतिम निकाल लागेपर्यंत हा पूल काढून घेऊ नये. परवानगी घेऊन पूल दुरुस्त करावा. यासाठी एक दिवस पूल बंद ठेवण्यात येईल, असा निर्णय बैठकीत झाला. (प्रतिनिधी)
बोपखेल तरंगता पूल हटविण्यास नकार
By admin | Published: October 16, 2015 1:04 AM