लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने खरेदी केलेल्या पाण्याच्या दोन अत्याधुनिक बहुउद्देशीय टँकर्सचे रक्षा संपदा महासंचालक जोजनेश्वर शर्मा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सुमारे ६६ लाख रुपये खर्च झालेल्या टँकर्सचा प्रामुख्याने कॅन्टोन्मेंट हद्दीत पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी येणार आहे. आगीसारख्या घटनाच्या वेळीही वापर करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंटने जानेवारीत ३४ लाख रुपये खर्चून पाण्याच्या टँकरच्या चॅसीस खरेदीचा ठराव संमत केला होता. चॅसीसवर पाण्याची टाकीसह अत्याधुनिक सुविधांयुक्त बॉडी बांधण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. ३१ लाख ५० हजार रुपयांची सर्वात कमी दराची निविदा मान्य करण्यात आली होती. त्यानुसार बांधणी केली आहे. शनिवारी दिल्ली येथील रक्षा संपदा महासंचालक शर्मा हे देहूरोड कॅन्टोन्मेंटची पाहणी करण्यासाठी आले. त्या वेळी त्यांच्या हस्ते पूजा करून टँकर्सचे लोकार्पण करण्यात आले. बोर्डाच्या उपाध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत उपस्थित होते.
दोन बहुउद्देशीय टँकर्सचे लोकार्पण
By admin | Published: June 27, 2017 7:18 AM