पिंपरी : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून धरणाच्या पाणीसाठ्यात एक टक्का वाढ झाली आहे. गुरुवारी (दि. २९) पाणीसाठा वाढून तो १८.१४ टक्के इतका झाला आहे.
जून महिना संपत आला, तरी मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नव्हती. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत होता. तो साठा जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका होता. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरात पाणीकपात लागू करण्याबाबत नियोजन सुरू होते. धरणात मंगळवार (दि. २७) पर्यंत १७.५५ टक्के इतका पाणीसाठा होता.
१५ ऑगस्टपर्यंत धरण १०० टक्के...
बुधवारी (दि. २८) धरणातील पाणीसाठा १७.६७ टक्के इतका झाला, तर गुरुवारी (दि. २९) पाणीसाठा १८.१४ टक्के इतका वाढला आहे. गुरुवारी ५५ मिलिलिटर पाण्याची नोंद झाली आहे. धरणात पाणीसाठा वाढू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास १५ ऑगस्टपर्यंत धरण १०० टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी या दिवशी धरणात १७.७९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा असल्याचे दिसत आहे.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. डोंगर, ओढे पाण्याने वाहू लागले आहेत. ते पाणी धरण क्षेत्रात जमा होऊ लागल्याने धरणात पाणीसाठा वाढत आहे.
- समीर मोरे, शाखा अभियंता, पवना धरण