- विश्वास मोरे
पिंपरी : जागतिक नकाशावर औद्योगिकनगरी म्हणून लौकिक मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा भौतिक विकास झपाट्याने झाला; पण शहरासाठी स्थानिक एकमुखी आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वांचा अभाव आहे. क्षमता असतानाही शहराचा सर्वांगीण विकास झालेला नाही. सुवर्णमहोत्सव पूर्ण केलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची महापालिका मंगळवारी (दि. ११) चाळिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. तरीही पुणे, बारामती आणि मुंबईवरून नियंत्रित केला जाणारा रिमोट कंट्रोल जाऊन स्थानिक नेतृत्व सक्षम कधी होणार? द्वेषविरहित राजकारण आणि गावकी भावकीतून स्थानिक नेते बाहेर पडून एकात्मिक विकासाचे स्वप्न साकार करणार का? आतातरी स्थानिक नेत्यांचा स्वाभिमान जागा होणार की नाही? असा सवाल सुजाण नागरिक उपस्थित करीत आहेत.
पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास झाला. स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांच्या संकल्पनेतून या शहराची निर्मिती झाली. ११ ऑक्टोबर १९८२ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. पहिले महापौर होण्याचा मान ज्ञानेश्वर लांडगे यांना मिळाला. त्यानंतर गाव ते महानगर आणि महानगर ते मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी अशी वाटचाल सुरू आहे. गेल्या ५० वर्षांत येथील राजकारणावर पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील नेत्यांचा वरचष्मा राहिला आहे. स्थानिक पातळीवर महामंडळाचे राज्य मंत्रिपद, आमदार, खासदार, महापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता अशी विविध पदे शहरातील नेतृत्वास मिळाली. तरी सत्तासूत्रे बारामती आणि पुणे, मुंबईतील नेत्यांच्या हाती राहिली आहेत.
बाहेरील नेत्यांचा वरचष्मा
माजी मुख्यमंत्री शरद पवार, प्रा. रामकृष्ण मोरे, अजित पवार यांनी शहराचे नेतृत्व केले. मोरे यांच्या निधनानंतर सुरेश कलमाडी आणि हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांनी काहीकाळ शहराचा कारभार पाहिला. २०१७ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिकांचे नेतृत्व असले तरी त्यांचा रिमोट एक, तर बारामती आणि अलीकडच्या काळात मुंबईत राहिला आहे. त्यामुळेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाहेरच्या नेतृत्वावर अवलंबून रहावे लागत आहे.
नेतृत्वास सक्षम होऊ दिले नाही
माजी आमदार सोपानराव फुगे, मोतीराम पवार, अशोक तापकीर, ज्ञानेश्वर लांडगे, माजी खासदार गजानन बाबर, माजी आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व अण्णा बनसोडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर आझम पानसरे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे मंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे व लोकलेखा समितीचे ॲड. सचिन पटवर्धन या विविध स्थानिक नेत्यांनी पदे भूषविली. मात्र, कोण्या एका व्यक्तीस शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळू दिलेली नाही. स्थानिक पातळीवरील नेते भांडत ठेवून रिमोट कंट्रोलचे राजकारण बाहेरून केले जात आहे.
राज्यपातळीवर मिळाली नाही संधी...
नाना शितोळे, तात्या कदम, अशोक कदम, भाई सोनावणे, अंकुशराव लांडगे, मंगला कदम, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, सुलभा उबाळे, सीमा सावळे, संजोग वाघेरे, मानव कांबळे, मारुती भापकर, चंद्रकांता सोनकांबळे, बाबा धुमाळ, एकनाथ पवार, राहुल कलाटे, प्रशांत शितोळे, विलास मडिगेरी, नाना काटे, सचिन साठे या स्थानिक नेत्यांमध्ये क्षमता असूनही राज्य पातळीवर काम करण्याची त्यांना संधी मिळू शकली नाही. तसेच गेल्या पंधरा वर्षांत स्थानिक नेते भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या विधानसभा आणि काहीजण माझा वॉर्ड व माझी विधानसभा यात घुटमळत आहेत. मात्र, शहर पातळीवरील विकासाची दृष्टी स्थानिक नेत्यांमध्ये दिसून येत नाही, हे वास्तव आहे.