पिंपरी: येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन केले. या वेळी इव्हीएम हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली. 'चौकशी न झाल्यास जनतेतून मोठा उठाव होऊन ईव्हीएम हटविले जाईल,असा सूर आंदोलनातील विविध सामाजिक पदाधिकाऱ्यांनी आळविला.
या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, धम्मराज साळवे, शांताराम खुडे, रोहिनाज शेख, प्रदीप पवार, संजीवनी पुराणिक, सीपीएमचे सचिन देसाई, संतोष शिंदे, शरद थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले.
शहराध्यक्ष सतीश काळे म्हणाले, 'लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेला अपेक्षित असलेले मुद्दे, शासकीय धोरणे राबविण्याबरोबरच जनताच या देशातील सत्तेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींचे भवितव्य ठरवत आहे. मात्र सत्तेचा गैरवापर करून जेव्हा जनतेच्या हातातून अनेक गोष्टी घालविल्या जातात. तेव्हा जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण होतो. निकालाची योग्य चौकशी करावी.'