दिघी : परिसरातील आदर्शनगरमधील मंजुरीबाई विद्यालयात आई-बाबांस पत्र लिहून मतदान करा, अशी विनंती करीत ते पत्र आपल्या पालकांना देऊन मतदार जनजागृतीपर अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला महत्त्वाचा हक्क आहे. मतदार जनजागृती या उपक्रमाचे आयोजन ‘आई-बाबांस पत्र’ या अभिनव उपक्रमांतर्गत मंजुरीबाई विद्यालयात केले होते. उपक्रमात पाचवी ते नववीत शिकणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पालकांना पत्र लिहून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची विनंती केली. मतदान करणे हा प्रत्येक प्रौढ नागरिकाचा हक्क तर आहेच सोबत कर्तव्यदेखील आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. अशा आशयाचे पत्र लिहून मुलांनी त्यांच्या आई-बाबा, आजी-आजोबा, ताई -दादाला मतदान करण्याचा हट्ट धरून जनजागृती केली आहे.४दिघीतील रामचंद्र गायकवाड विद्यालय येथेही हा कार्यक़्रम झाला. या कार्यक्रमासाठी नवजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय गायकवाड, अध्यक्ष विनायक वाळके, सचिव रवींद्र गायकवाड, संस्थेच्या व्यवस्थापिका अश्विनी गायकवाड तसेच सर्व संचालक, प्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक उपस्थित होते.४विद्यालयात मतदान लोकशाहीचा पाया, लोकशाहीत नवीन मतदाराची भूमिका, नैतिक मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य, जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या विषयांवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत वैष्णवी ठेंबे, किरण माने, अपेक्षा भोसले या विद्यार्थिनींनी बक्षीस मिळविले. या वेळी मतदान केंद्रप्रमुख वसंत पाटील, प्राचार्य भास्कर भोसले यांनी मतदान एक कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले.