हिंजवडी : पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकाच कुटूंबातील तीन जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. रविवारी सकाळी आठच्या सुमारास वाकड येथे ही घटना घडली. ज्योती संतोष खरात (वय ३), शितल संतोष खरात (वय ३५), संतोष रामचंद्र खरात (वय ४६) अशी सुखरूप बाहेर काढलेल्या नागरिकांची नावे आहेत.
मुळशी तालुक्यातील धरणक्षेत्र परिसरात मागील दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मुळशी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळानदी पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाकड गावठाण येथील म्हातोबा मंदिर, दशक्रिया विधीच्या घाट, स्मशानभूमी परिसर, पत्रा शेड परिसर, मानकर चौक, सुर्या मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल, मजूर वस्ती पाण्याने वेढला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी सकाळी आठच्या सुमारास वाकड गावठाण परिसरात एकाच कुटुंबातील तीनजण पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. स्थानिक अग्निशामक दलाचे जवान आणि वाकड पोलिसांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. वाकड जगताप डेअरी रस्त्यावरील मानकर चौकात देखील नदीपात्रातील पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई -बंगळूर राष्ट्रीय महामर्गावरील वाकड जकात नाका जवळील सूर्या मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल इमारतीमध्ये पाणी शिरल्याने रूग्णांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याच्या सूचना अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. वाकड येथील कस्पटेवस्ती याठिकाणी सुद्धा दोघे जण पुराच्या पाण्यात अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.
सध्या मुळशी धरणातून २८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मुळशी धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असून मागील चोवीस तासात ९०० मिमि पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. नदी किनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई बंगळूर महामार्गावरील वाकड येथे हिंजवडी हद्दीतील सेवा रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला दोन ते तिन इंच तडे गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. वाकड पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिका प्रशासनास याबाबत कळविले आहे.