पिंपरी : हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञाननगरीकडे जाणाºया रस्त्यावरील प्रवास सुकर व्हावा यासाठी वाकड कस्पटे चौक आणि महापालिका शाळा चौकापर्यंतचा रस्ता सिग्नलविरहित करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आला आहे.शहराच्या सीमेवर हिंजवडी आयटी पार्क विकसित झाला आहे. २२५ पेक्षा अधिक कंपन्या असून सुमारे एक लाख अभियंते काम करीत आहेत. दररोज कामानिमित्त प्रवास करणाºयांची अंदाजे संख्या काही लाखात आहे. सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हिंजवडीच्या रस्त्यावरून सुमारे एक लाख चारचाकी वाहने ऐकावेळी जातात. तर दीड लाख दुचाकी जातात. त्यामुळे आयटी पार्क म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीला वाहतूककोंडीने ग्रासले आहे. येथील वाहतूककोंडी कमी करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. पण ते सगळे व्यर्थ ठरत आहेत. येथील वाहतूककोंडीला स्थानिक नागरिक व नोकरदारांना रोज तोंड द्यावे लागत आहे. मात्र, यावर तोडगा निघत नाही. हिंजवडीबरोबरच वाकड येथील कस्पटे चौक, जगताप डेअरी, भूमकर चौक या भागातही वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. त्याविषयी ‘लोकमत’ने ‘असुरक्षित आयटीनगरी’ अशी मालिका प्रसिद्ध केली होती.महापालिका मंजूर विकास आराखड्यानुसार, वाकड येथील कस्पटे चौकात ४५ मीटर रुंदीचा रस्ता आहे. या रस्त्यामध्ये भोसरी ते वाकड बीआरटी कॉरिडॉर कार्यरत आहे. या कॉरिडॉरच्या पूर्वेस २४ मीटर रस्ता येत असून दक्षिणेकडून २४ मीटर रुंदीचा पुणे महापालिकेच्या उड्डाणपुलावरील रस्ता पुण्यातून येतो. सद्य:स्थितीत पुणे महापालिकेच्या उड्डाणपुलावरील रस्ता वाहतुकीसाठी खुला नाही. त्यामुळे या चौकात हिंजवडीकडील रस्त्यावर सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी होते. त्यासाठी फ्लाय ओव्हर व ग्रेड सेपरेटर उपयोगी ठरणार आहे.सिग्नलविरहित चौकवाकडमधील शाळा चौकात पूर्व - पश्चिम ४५ मीटर रुंदीचा रस्ता आहे. या रस्त्यातील भोसरी ते वाकड बीआरटी कॉरिडॉरच्या उत्तरेस ४५ मीटर रुंदीचा रस्ता डांगे चौकातून येतो. तर दक्षिणेकडे २४ मीटर रस्ता गावठाणात जातो. या चौकातही वाहतूककोंडी होते. त्यामुळे ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी चौक सिग्नलविरहित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.वाहतूक सर्वेक्षण करणारकस्पटे चौक आणि महापालिका शाळा चौकात ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल या कामासाठी ट्रॅफिक सर्व्हे, माती परीक्षण तसेच जमिनीच्या सर्व्हेक्षणाबरोबरच मार्गालगत असलेल्या मालमत्तासाठी सेवा वाहिन्यांबाबतचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. प्रस्तावित रस्त्याचे व सेवा वाहिन्यांचे डिझाईन तयार करणे, ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करणे, त्याप्रमाणे अर्थसंकल्प तयार करून निविदा प्रसिद्ध करेपर्यंत निविदा पूर्व कामे करून घेणे. तसेच या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यापासून निविदा पश्चात कामांवर देखरेख करणे, गुणवत्तेने काम करून घेणे, दैनंदिन मोजमापे घेणे, यासाठी बीआरटीएस विभागाकडे तांत्रिक कर्मचारी कमी आहेत. हे संपूर्ण काम गुणवत्तेने व वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक केली आहे.
वाहतूक कोंडीतून सुटका : वाकडला ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 3:00 AM