पिंपरी-चिंचवड, दि.13 - वाकड येथील पिंपळे निळख परिसरात ऐन रहिवाशी परिसरात शाळांच्या गराड्यात नव्याने सुरू होत असलेल्या तसेच अवैधरित्या चालू असलेल्या मद्यविक्री दुकानांविरोधात स्थानिक नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी १२ च्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील रहिवाशांसह महिलांची संख्या लक्षणीय होती.
पिंपळे निळख येथील गोकुळधाम या सोसायटीच्या इमारतीत बिल्डरची एनओसी न घेता व्यावसायिक गाळ्यात फेरबदल करण्यात आल्याने इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तसेच सुरुवातीला दुकानावर स्वीट होमचा फलक लावून काम करण्यात येत होते. मात्र, शनिवारी अचानक तो फलक हटवून 'वाईन्स शॉप' चे लेबल चढविण्यात आले. नागरिकांचा विरोध होताच तोही फलक गायब झाला, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सुमारे ३० हजार लोकवस्तीचा हा भाग असून प्रामुख्याने येथे रहिवाशी सोसायट्या आहेत. गोकुळधाम सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून होत असलेल्या ह्या शॉपला स्थानिक रहिवाशांचा मोठा विरोध आहे. या दुकानाशेजारीच परिसरात असलेल्या ६ शाळेच्या विद्यार्थ्यांचे बस स्थानक आहे, तर या शॉपमुळे परिसरातून वावरत येणे कठीण होईल याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना अडीज हजार नागरिकांच्या सहीचे निवेदन देण्यात आले होते यावर त्यांनी ते दुकान होणार नसल्याचे आश्वासन दिले. मात्र, दुकान केवळ नागरिकांच्या विरोधामुळे सुरु होता होता थांबले. पिंपळे निळख चौकात अरविंद वाईन्स सुरू आहे. या ठिकाणी मद्यपी भर रस्त्यावर दारू पित बसतात. या दुकानदराने संपूर्ण अनधिकृत बांधकाम करून दुकान थाटले त्यासाठी अनेक वृक्षांची कत्तल देखील केली आहे मद्य विक्री दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना नाहक मन:स्थाप सहन करावा लागत आहे त्यामुळे या ठिकाणचे वाईन्स शॉप देखील बंद करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. नगरसेवक तुषार कामठे यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी नगरसेविका ममता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड या मोर्चामध्ये नागरिकांच्या वतीने सहभागी झाले होते.