पिंपरी : जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर समिती सदस्यांनीही राजीनामे दिले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने त्यांनी राजीनामे मागे घेतले आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडे लक्ष न दिल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्षपदी सचिन साठे यांची निवड झाली होती. सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईरांसह दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. हा पराभव साठे यांच्या जिव्हारी लागला होता. पक्षबांधणीसाठी प्रयत्न करूनही पक्षाने ताकद न दिल्याने पराभवास सामोरे जावे लागल्याची खंतही साठे यांनी व्यक्त केली होती. तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शहर समितीतील अन्य सदस्यांनीही राजीनामे दिले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे.याविषयी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे मागे घेतल्याची घोषणा केली. महाजन म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. समजूत काढली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राजीनामे मागे घेतले आहेत. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. साठे म्हणाले, शहराध्यक्षपदाच्या कालखंडात मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. एक वर्षापूर्वी पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व सहकाऱ्यांमध्ये पुढील कार्यकाळाकरिता अध्यक्षपदावर पुनश्च निवड केली होती. पदावर राहूनही कार्यकर्त्यांना व पक्षाला न्याय देऊ शकलो नव्हतो. त्यामुळे राजीनामा दिला होता. पक्षश्रेष्ठींनी समजूत काढली. त्यामुळे राजीनामे मागे घेतले आहेत. पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत.
पिंपरीच्या काँग्रेस शहराध़्यक्षांचे राजीनामास्त्र म्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 6:39 PM
तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे.
ठळक मुद्देप्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे मागे घेतल्याची केली घोषणा