पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमार्फत भोसरी येथे उभारलेल्या रुग्णालय खासगीकरणास भाजपाने विरोध केला आहे. आज सुमारे पाच हजार नागरिकांनी भोसरीत आंदोलन केले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांसह विरोधीपक्षाने आयुक्तांना निवेदन दिले. खासगीकरणास विरोध दर्शविला.भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणास शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. त्यापाठोपाठ भाजपातील एका गटानेही विरोध दर्शविला आहे. भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
नीलेश मुटके, शेखर लांडगे, भरत लांडगे, आशा लांडगे, संतोष लांडे आदी सहभागी झाले होते. त्यानंतर नगरसेवक रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या आंदोलनात भोसरीतील सर्वसामान्य नागरिकांसह शहारातील आधार सोशल फाउंडेशन, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, नवशक्ती बालाजी ग्रुप, अखिल भारतीय छावा मराठी युवा संघटन, जय महाराष्ट्र कामगार सेना, महाराष्ट्र मजूर पक्ष, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, दलित स्वयंसेवक संघ इत्यादी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.मनपाच्या वाय.सी.एम. रुग्णालयांमध्ये शहरातीलच नव्हे तर शहराबाहेरून पुणे जिल्ह्यातून रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. शहरामध्ये वाय.सी.एम. रुग्णालयासह, तालेरा, जिजामाता, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भोसरी, आकुर्डी, यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील, इत्यादी रुग्णालये सद्य:स्थितीत कार्यरत असून, ती समाधानकारक वैद्यकीय सुविधा शहरातील नागरिकांना पुरवित आहेत. शहरातील गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्यच आहे. परंतु या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. या आधी रुबी अल केअर खासगी संस्थेमार्फत चालविण्यास दिले आहे. त्याचा अनुभव क्लेशदायक आहे. तसेच वाय.सी.एम. रुग्णालयात लवकरच पदवीव्युतर अभ्यासक्रम चालू होणार आहे. त्यामुळे या संस्थेतून तज्ज्ञ डॉक्टर्स मनपास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खासगीकरण कशासाठी? आणि कोणासाठी? - दत्ता साने, विरोधी पक्षनेता महापालिकाआरोग्य वैद्यकीय सुविधा ही मनपाची मूलभूत सुविधा असून, शहरातील गोरगरीब, झोपडपट्टीतील व सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा अतिशय महत्त्वाची आहे. मनुष्यबळ नाही म्हणून खासगीकरण करणे योग्य आहे का? उद्या मनुष्यबळ नाही म्हणून महापालिका खासगी तत्त्वावर चालवायला देणार का? खासगीकरणाने व्यावसायिक रूप प्राप्त होणार आहे.- रवी लांडगे, नगरसेवक, भाजप