चिंचवड - शाळा स्थलांतराला विरोध करत गुुरुवारी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना बसवून ठेवले. प्रेमलोक पार्कमधील महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यमाच्या इमारतीत शहराचे नवे पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथील शाळा दळवीनगर येथील नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणावरून पालकांनी याला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने गुरुवारी विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारावर बसले. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.शहरात नव्याने सुरू होणारे पोलीस आयुक्तालय चिंचवडमधील प्रेमलोक पार्कमध्ये सुरू होणार आहे. यासाठी येथील शाळा दळवीनगरमध्ये स्थलांतरित झाली असल्याचे फलक महापालिकेच्या वतीने लावण्यात आल्याने संतप्त पालकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. नवीन इमारत रेल्वे लाइनलगत असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार असून, येथील वातावरण सुरक्षित नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन शाळेत पाठविणार नसल्याचे सांगत ठिय्या आंदोलन करण्यात आले.पालक व विद्यार्थी तीन दिवसांपासून प्रेमलोक पार्क येथील शाळेच्या प्रवेशद्वारावर येऊन आंदोलन करत आहेत. स्थानिक नगरसेवक, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, महापालिकेतील सत्ताधारी पक्षनेते एकनाथ पवार, पोलीस अधिकाऱ्यांनी पालकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देऊन समजूत काढली. मात्र पालक निर्णयावर ठाम असल्याने तोडगा निघाला नाही.सुसज्ज इमारतीत केवळ शिक्षकचशाळेचा शुक्रवार पहिला दिवस असल्याने शाळा नवीन जागेत स्थलांतरित केल्याचा फलक गुरुवारी लावण्यात आला. शिक्षक नवीन जागेत रुजू झाले. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना नवीन शाळेत पाठविले नाही. नवीन शाळेत गुरुवारी १२ मुलांनी हजेरी लावली. प्रेमलोक पार्कमधील शाळेसमोर पालकांचा विरोध लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.महापालिका प्रशासनाने दळवीनगर येथील शाळेची नवी इमारत सुसज्ज केली आहे. आधुनिक सोयीसुविधा असणारी सर्व व्यवस्था येथे करण्यात आली आहे. नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. मात्र पालकांच्या भूमिकेमुळेनवीन इमारतीत विद्यार्थी रस्त्यावर बसून आहेत. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर अभ्यास केला. काहींनी कवायतीचे प्रकारही केले.
शाळा स्थलांतराला विरोध, पहिल्याच दिवशी विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:21 AM