लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : सामान्य जनतेला बिनचूक डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा हा १ आॅगस्ट २०१७ पासून उपलब्ध करण्यासाठी शासनाने चावडीवाचन ही विशेष मोहीम सुरू केली आहे. देहूरोड परिसरातील चिंचोलीगावात या मोहिमेंतर्गत संगणकीकृत सात-बारा अचूक असल्याची खात्री करण्यासाठी चावडीवाचन घेण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. चिंचवड मंडल कार्यालयांतर्गत चिंचोली येथे चावडीवाचन कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना त्यांचा संगणकीकृत सात-बारा पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला होता. या वेळी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून चिंचवड मंडल कार्यालयाचे मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी मारुती पवार यांच्यासह चिंचोलीतील शेतकरी उपस्थित होते. चिंचोलीतील सर्वाधिक शेतजमीन लष्कराच्या ताब्यात असल्याने सर्वाधिक सातबारा उताऱ्यावर मिलिटरी असा उल्लेख दिसून आला. उर्वरित सातबारावर देहू दारूगोळा कोठाराच्या प्रतिबंधित क्षेत्रबाधित असे शिक्के मारले असल्याने शेतकऱ्यांनी शिक्के काढण्याची मागणी केली. या वेळी कॅन्टोन्मेन्टचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ पानसरे, बाळासाहेब जाधव, धनंजय सावंत, आशिष गायकवाड, प्रकाश गायकवाड, तुकाराम जाधव , माणिक जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
सातबारा चावडी वाचनाला प्रतिसाद
By admin | Published: June 12, 2017 1:28 AM