पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक एप्रिलपासून हौसिंग सोसायट्यांमधील ओला कचरा उचलण्यात येणार नाही. कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी सोसायट्यांवरच दिली आहे. सुका कचरा महापालिका उचलणार आहे.
महापालिका परिसरातील विविध भागातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी ही महापालिकेवर असते. ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने नागरिकांना तीन प्रकारच्या कुंड्याही दिल्या होत्या. या संदर्भातील परिपत्रक आयुक्तांनी काढले आहे. हौसिंग सोसायट्यांबरोबरच हॉटेल, मंगल कार्यालये, खाणावळ, वसतिगृह, उपाहारगृह, शाळा, महाविद्यालये, मंडई व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना हे बंधन महापालिकेने घातले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा नियम करण्यात आला आहे. या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने संबंधितांना याबाबतचे जनजागृतीपर पत्र पाठविण्यात आले आहे.
जबाबदारी सोसायट्यांवर
७५ सदनिका आणि शंभर किलो कचरा गोळा होणा-या संस्थांचा ओला कचरा येत्या एक एप्रिलपासून उचलणार नाही. घनकचरा व्यवस्थापन २०१६ मधील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. निर्माण झालेल्या ओल्या कच-यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करून तो जिरवावा, असे बंधन महापालिकेने घातले आहे. या संदर्भात संबंधित सोसायट्या व आस्थापनांनी खतनिर्मिती प्रकल्पाची व्यवस्था करण्यासाठी मुदत दिली आहे. या सोसायट्या व आस्थापनांकडून केवळ सुका कचरा महापालिका स्वीकारणार आहे.
हा कचरा स्वीकारणार नाही ...
ओला कचरा कोणता? : घरातील कचरा, भाजी व फळांची साले, उरलेले अन्न, अंड्यांची टरफले, कुजलेली फळे व भाज्या, चहा व कॉफीची पूड, मांसाहारी खाद्यपदार्थ, शहाळे, नारळ्याचा शेंड्या, हार, फुले, निर्माल्य, पालापाचोळा, डहाळी, सुकलेली पाने, गवत, खराब टिश्शू पेपर, केस.
सुका कचरा स्वीकारणार : प्लॅस्टिक पिशव्या व वस्तू, बाटल्या, डबे, कप, दुधाची पिशवी, चॉकलेट, टॉफी व चिप्सचे आवरण, वर्तमानपत्रे, मासिके, स्टेशनरी, कागदी बॉक्स, टेट्रा पॅक, कागदी कप, प्लेट, धातू, धातूचे बॉक्स, धातूचे कंटेनर, डबे, काचेच्या बाटल्या, रबर, थर्माकोल, जुन्या चिंध्या, फडके, स्पंज, सौंदर्य प्रसाधने, लाकूड व चिनी मातीच्या वस्तू.