पिंपरी :भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर दुखापत झाली. रूग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कालीदास काळोखे (वय ६३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शंकर काळोखे (वय ६०,रा.प्राधिकरण) यांनी अज्ञात रिक्षाचालकाविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. भेळ चौक निगडी येथून जात असताना, विनायक काळोखे यांच्या ताब्यातील नॅनो मोटारीला रिक्षाचालकाने धडक दिली. या अपघातात नॅनो रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यावेळी काळोखे यांचे बंधु कालिदास यांच्या छातीला जबर मार लागला. ते बेशुद्ध पडले. त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघात स्थही न थांबता, पोलिसांना माहिती न देता रिक्षाचालक तेथून पळून गेला. कालीदास काळोखे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.