थेरगाव : पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटी मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केला आहे. त्यामुळे वाहतुकीला व पीएमपी बसला अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडीचा प्रकार घडत आहे.
महापालिकेने शहरात ‘बीआरटी’चे जाळे निर्माण केले. त्यासाठी रावेत-औंध बीआरटी मार्ग खुला केला; पण रिक्षाचालकांनी या ठिकाणी रिक्षातळ तयार केला आहे़ तसेच अनेकदा दुचाकी व खासगी वाहनचालकसुद्धा नियमांचे उल्लंघन करून बीआरटी मार्गातून वाहने नेताना दिसतात़ त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर होत आहे. बीआरटी मार्गाच्या कडेला अनधिकृत वाहनतळ करण्यात आले आहे. याशिवाय बाहेरील सेवा रस्त्याच्या कडेलाही हातगाड्या, चारचाकी, दुचाकी वाहने उभी केली आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावरून वाहन चालविणे जिकिरीचे बनत आहे. थेरगाव परिसरात तसेच आजूबाजूच्या वाकड, हिंजवडी या भागात दाट लोकवस्ती आहे. सकाळी कामावर जाताना व परतताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. नागरिकांच्या सोईसुविधेसाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने पीएमपीने बीआरटी मार्ग चालू केले आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या जशी जशी वाढत आहे तसे तसे वाहतुकीच्या संख्येमध्येही भर पडत आहे आणि शहरामध्ये पीएमटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी बीआरटीच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी रिक्षाचालकांनी आपला रिक्षा थांबा तयार केलेला आहे. परिणामी, वाहतुकीला आणि पीएमपी बसला अडथळा निर्माण होत आहे. या गोष्टींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.