पिंपरी : महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हातगाडी व फेरीवाल्यांना जागा देण्यात येणार आहेत. ‘ड’ प्रभागातील फेरीवाल्यांना जागा देण्यात येणार आहे. त्याची सोडत शुक्रवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील फेरीवाल्यांचे २०१२ मध्ये आणि उर्वरित फेरीवाल्यांचे जानेवारी २०१४ मध्ये अर्ज मागविले होते. त्यानंतर पात्र-अपात्र फेरीवाल्यांची यादी निश्चित केली. त्यातील पात्र फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करून त्यांना महापालिका ‘ड’ प्रभाग कार्यालयाकडून फेरीवाला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.स्मिता झगडे म्हणाल्या, ‘‘फेरीवाल्यांना देण्यासाठी ‘ड’ प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या पोलीस लाईनजवळ, वाकड येथील कावेरीनगर रोडवर आणि राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारी, राजीव गांधीनगर समोरील जागा निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी या जागा क्रमाने वाटप करण्यात येणार असून, कावेरीनगर रोडवरील जागेसाठी सकाळी अकरा वाजता, तर राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील जागेसाठी दुपारी तीन वाजता चिठ्ठ्या टाकून सोडत करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित फेरीवाल्यांनी औंध रावेत रोड, रहाटणी येथील ‘ड’ प्रभाग कार्यालय येथे दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे.’’
फेरीवाल्यांना मिळणार शहरात हक्काची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 5:34 AM