पिंपरी : शारदीय नवरात्रोत्सव शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवास रंगत येत आहे. देवीच्या दर्शनासाठी आणि पूजा, आरतीसाठी गर्दी करणारे भाविक सायंकाळनंतर होणाºया दांडिया आणि मनोरंजक कार्यक्रमांनाही गर्दी करीत आहेत. विविध समाजपयोगी उपक्रमही काही मंडळांकडून आयोजित करण्यात येत आहेत. व्याख्यानाबरोबर कथा महायत्राचे आयोजन करण्यात येत आहे.दिघीत नवदुर्गा महात्म्यदिघी : गावठाणातील अमर मित्र मंडळाने नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा महात्म्य व स्त्री संत चरित्र महायज्ञाचे आयोजन केले आहे. रामायणाचार्य व भागवताचार्य ह.भ.प. सु. श्री. साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी यांच्या सुश्राव्य वाणीने नवदुर्गेचा महिमा, आराधना यासोबत संगीत भजनाचा आध्यात्मिक आनंद मिळत असून, पंचक्रोशीतील हजारो भाविक कथा महायज्ञाला उपस्थित रहात आहेत.दिघीतील राघव मंगल कार्यालयात सुरू असलेल्या नवदुर्गा कथा महायज्ञात नवदुर्गेच्या नऊ रूपातील अवताराचा महिमा यामध्ये शैल्यपुत्रीमाता, चंद्रघंटामाता महात्म्य, ब्रह्मचारिणीमाता, कुष्मांडीमाता, स्कंदमाता महात्म्य, कात्यायनीमाता, कालरात्री महात्म्य, महागौरी माता महात्म्य, सिद्धरात्री, शक्तिपीठ महात्म्य व पंचकन्या महात्म्य अशा आध्यात्मिक कथा देवी अवतारांची रूपे साकारून सांगितली जात आहेत. कथा ऐकत असताना समोर नाट्यरूपात असुरांचा संहार, अवतार धारण केलेली विविध रूपे, सोबतीला सुमधूर गायन व वादनाने भाविक मंत्रमुग्ध होऊन जात आहेत. आध्यात्मिक कथांसोबतच समाजातील थोर स्त्री संताच्या कथा व चरित्र यामध्ये संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई यांच्या भक्तीचा महिमा व आपल्या सांसारिक कार्यातून प्राप्त झालेली ईश्वराची अनुभूती, स्त्री व नारी शक्तीचा जागर नऊ दिवस दिघीकरांना अनुभवता येणार आहे. रोज दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत या सुश्राव्य कथा महायज्ञ होत असल्याचे अमर मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कदम यांनी सांगितले.
विलोभनीय मूर्तीचे पूजनसांगवी : सांगवी परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, महिला मंडळ आणि विविध मित्र मंडळांच्या विलोभनीय मूर्तींचे परिसरात भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे़ परिसरातील कीर्तीनगर, त्रिमूर्तीनगर, काटेपुरम चौक, येथील मित्र मंडळ विशेष उल्लेखनीय दिसून येत असून, भक्तीतून सामाजिक उपक्रमांचा वारसा जपण्यात मंडळे विशेष भूमिका बजावत आहेत.नवी सांगवी परिसरातील कीर्तीनगर येथील मातोश्री महिला मंडळ १९९५ पासून कुठलीही लोक वर्गणी न घेता देवी स्थापना आणि विविध महिलांसाठी सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे. या मंडळाच्या अधक्षा सुरेखा चव्हाण, अनिता शिंदे, रजनी पांडे, अंजली कुलकर्णी, लता कदम आदी महिला ह्या उपक्रमात सहभागी झाल्या असून, अथर्वशीर्षपठण, कुंकुमार्चन आदींचे महिलांसाठी आयोजन करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.त्रिमूर्ती कॉलनी, काटेपुरम चौक श्री महालक्ष्मी महिलामंडळ, विद्यानागर महिलामंडळ येथील मंडळांनीही नवरात्र गरबा आदी कार्यक्रमांचे आयोजन केलेआहे़
रावेतमध्ये दांडिया स्पर्धारावेत : वाल्हेकरवाडी येथील मल्हार छावा प्रतिष्ठानच्या वतीने आणि क्रांती महिला प्रतिष्ठान, अविनाश युवा प्रतिष्ठान, कै़ नितीनभाऊ युवा मंच, बिजलीनगर युवा प्रतिष्ठान आणि भोलेश्वर मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘नवरात्रोत्सव २०१७’ अंतर्गत दांडिया स्पर्धा आयोजित केली आहे. त्यातून स्पर्धकांना दररोज एक स्कूटी व इतर बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.बिजलीनगर स्पाइन मार्गावरील मैदानावर दरम्यान नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्रोत्सवात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान रक्तदान, नेत्रदान शिबिर, डोळे, कान, नाक, घसा तपासणी, लहान मुलांची व स्त्रीरोग तपासणी, कॅन्सर तपासणी, मूत्र रोग, कीडनी आजार, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, हृदयरोग, मेंदू आजार, मणक्याचे आजार, हाडांचे आजार आदी मोफत उपचार सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवाय महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी व महिला सबलीकरणासाठी बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन क्रांतिथडी जत्रा अंतर्गत भरविण्यात आले आहे़ नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे़ महोत्सवाचे आयोजन संदीप चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश सूर्यवंशी, युवराज चिंचवडे, मयूरेश चिंचवडे, मयूर पवार, हर्षवर्धन भोईर, महादेव वाघमारे, शुभम वाजे, श्रीनाथ काटे, धनंजय वाल्हेकर, योगेश फुरडे, प्रताप कोळेकर, राजन सूर्यवंशी आदींनी केले आहे़बोपखेल : येथे गेले अठ्ठावीस वर्षांपासून नवरात्रोत्सवाची परंपरा सुरू आहे. येथे एक गाव एक मूर्ती अशा संकल्पनेने देवीची स्थापना केली जाते. या उत्सवात गावातील लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन नवरात्रोत्सव साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे.येथील शितळादेवी भजनी मंडळ ट्रस्ट साई प्रतिष्ठान हे मंडळ नवरात्रोत्सव साजरे करते. यामध्ये समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे की, कीर्तन, समाजप्रबोधनात्मक व्याख्याने व देवीची पूजा केली जाते.शितळादेवी भजनी मंडळ ट्रस्ट साई प्रतिष्ठानमध्ये बोपखेलमधील प्रत्येक तरुणाचा सहभाग असतो. कुठल्याही प्रकारचा धांगडधींगा न करता पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो़ त्यामुळे बोपखेल येथील ज्येष्ठ नागरिक व महिलाही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात. यावर्षी आयोध्यामधील राममंदिर हा देखावा सादर केला आहे. या देखाव्यास नागरिकांची पसंती मिळत आहे, अशी माहिती शितळादेवी भजनी मंडळ ट्रस्ट साई प्रतिष्ठान नियोजन समितीचे सदस्य कमलेश घुले यांनी दिली.