पिंपरी : मोबाईलमुळे संपर्क क्रांतीचे दिवस आले असले तरी मोबाईलचा वापर भर वर्दळीच्या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकीस्वार करत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, अशा ‘संपर्क अतिरेकी’ वाहनचालकांमुळे प्रवाही वाहतुकीला अडथळे येत असून संपूर्ण लक्ष वाहन चालविण्यावर ठेवण्याऐवजी संपर्कामध्ये असलेल्या अशा वाहनचालकांमुळे गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांपर्यंत मोबाईलची सवय आता मर्यादित राहिलेली नाही. आता दुचाकी, चारचाकी चालविता चालविता व्हॉट्सअॅपचे मेसेजही वाचणारे आता आढळू लागले आहेत. बोलण्याच्या, चॅटिंग करण्याच्या नादात आपला वाहतुकीला काही अडथळा होत असेल, हे अशा वाहनचालकांच्या गावीही नाही. त्यामुळे अन्य वाहनचालकांना मात्र त्रास होत आहे.मोबाईल हा शरीराचा एक अवयवच असल्याची स्थिती सार्वजनिक ठिकाणांवरून फिरत असताना दिसते. शहराच्या सर्वच भागांमध्ये हा प्रकार बोकाळला आहे. दुचाकीस्वार मोबाईल कान आणि खांद्यामध्ये धरून तिरकी मान करीत बराच वेळ बोलण्यात गर्क असतात. त्यावेळी वाहन चालविण्यात संपूर्ण लक्ष नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने वेडीवाकडी होत असतात. मागून जाणाऱ्या वाहनचालकांना अशा दुचाकीस्वाराचा अडथळा आल्याने ते जोरजोराने हॉर्न वाजवित असल्याचे दिसून येते. मात्र, हे वाहनचालक बोलण्यातच दंग असतात. (प्रतिनिधी)
संपर्क अतिरेकामुळे धोका
By admin | Published: March 23, 2017 4:25 AM