पिंपरी : शिवरायांचे गडकिल्ले सर करणाऱ्या सात वर्षांच्या बालमावळ्याने ५१ किलोमीटर सायकल चालवून ‘पुणे दर्शन’ केले. दापोडी येथील ‘सीएमई’, खडकी, लाल महाल, शनिवार वाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, डेक्कन, औंध, निगडी या मार्गावर त्याने सायकल चालवून अनोखा विक्रम केला. त्याच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे.
रिआन देवेंद्र चव्हाण, असे या बालमावळ्याचे नाव आहे. लहानपणापासून साहसी खेळांकडे त्याचा कल आहे. अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तिकोना, विसापूर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, मोहनदरी असे किल्ले व नेहमीच मनात येईल तेव्हा घराजवळचे घोराडेश्वर, चौराई माता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाई माता मंदिर, दुर्गा टेकडी टेक करत असतो.
रिआनचे वडील देवेंद्र चव्हाण पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पोलीस निरीक्षक आहेत. तर आई डॉ. अपर्णा या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र पुणे येथे शास्त्रज्ञ - ई पदावर कार्यरत आहेत. रिआन हा देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक - १ या शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. सतत गडकिल्ले सर करत असल्याने रिआर याला गडकिल्ल्यांबाबत उत्सुकता लागून आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याबाबत जाणून घेणे त्याला आवडते. सैनिकांबाबत अप्रुप वाटत असलेल्या रिआन याला खेळाडू होणाची इच्छा आहे.
लोकमत महामॅरेथाॅनमध्येही सहभाग
रिआन याने सहा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. यात लोकमतच्या पुणे येथील २०२२ व २०२३ या दोन्ही महामॅरेथाॅनमध्ये पाच किलोमीटरच्या गटातून त्याने यशस्वी सहभाग नोंदवला. पिंपरी -चिंचवड येथील पाच किलोमीटर मॅरेथॉन ३४ मिनिटांत त्याने पूर्ण केलेली आहे. स्पोर्ट्स फाॅर ऑल २०२२ या आठ वर्षांखालील वयोगटात रनिंगमध्ये तिसरा क्रमांक पटकावून कांस्य पदक पटकावलेले आहे.